Ahmednagar News : अहमदनगर जिल्हा तसा सहकाराचा. सहकार क्षेत्रात आदर्श घालून दिलेल्या जिल्ह्यात मागील काही दिवसात या सहकाराचे धिंडवडे काढायचे प्रकार घडल्याचे समोर आले. दरम्यान संपदा नागरी सहकारी पतसंस्था घोटाळा प्रकरण राज्यभर गाजले.
यात ज्ञानदेव वाफारे हा मुख्य आरोपी असून त्याच्यासह १७ आरोपी आहेत. १७ आरोपींच्या शिक्षेबाबत अंतिम निर्णय बुधवारी (दि. १०) देणार असल्याचे जाहीर केले. ज्ञानदेव वाफारे या प्रकरणातील मुख्य आरोपी असून त्याने
पतसंस्थेच्या पैशातून गाडी, बंगला, तसेच घरखर्चही पतसंस्थेच्या पैशातून केल्याचे चौकशीतून समोर आले आहे.
संपदा नागरी सहकारी पतसंस्थेच्या घोटाळाप्रकरणी दोषी धरलेल्या संचालक, कर्जदार आणि व्यवस्थापक, १७ जणांच्या शिक्षेबाबत जिल्हा व सत्र न्यायाधीश नाईकवाडी यांच्यासमोर सुनावणी झाली. सरकारी पक्षाच्या वतीने अॅड. वसंत ढगे यांनी बाजू मांडली, तर अवसायकाच्या वतीने अॅड. सुरेश लगड यांनी, तर ठेवीदारांच्या वतीने अॅड. अनिता दिघे यांनी युक्तिवाद केला.
यावेळी शिक्षेबाबत मुख्य आरोपी ज्ञानदेव वाफारे यांची पत्नी सुजाता यासह १७ आरोपींनी युक्तिवाद केला. यातील बहुतांश आरोपी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांनी आम्ही कागदोपत्रीच संचालक होतो. आम्हाला काहीही माहीत नाही, असा युक्तिवाद केला.
यातील काही आरोपी शेतकरी आहेत. त्यांनी आपल्यावर कुटुंब अवलंबून आहे. म्हणून कमीत कमी शिक्षा मिळावी, अशी विनंती केली. अनुप पारीख यांनी या घोटाळ्यामुळे आई-वडील मयत झाले आहेत. मी पुणे येथे नोकरीस आहे. शिक्षा झाल्यास माझे करिअर बर्बाद होईल, असा युक्तिवाद केला.
गाडी, बंगला यासह अनेक खर्च पतसंस्थेतून?
ज्ञानदेव वाफारे याने पतसंस्थेच्या पैशातून महागडी कार खरेदी केली. तसेच, त्याने घरही विकत घेतले. याशिवाय घराचा किराणा, वीज बिल, फोन बिल आणि निवडणुकीसाठी लागणारा खर्चही पतसंस्थेतूनच केल्याचे चौकशी समोर आले आहे.
तो या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. त्याची पत्नीही यात दोषी आढळली आहे. त्यामुळे आता उद्या न्यायालय शिक्षेबाबत काय सुनावणी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोणकोण आहेत आरोपी ?
या प्रकरणामध्ये ज्ञानदेव वाफारे, सुजाता वाफारे, सुधाकर थोरात, भाऊसाहेब झावरे, दिनकर ठुबे, राजे हसन अमीर, बबन झावरे, हरिश्चचंद लोंढे, रवींद्र शिंदे, साहेबराव भालचंद्र भालेराव, संजय चंपालाल बोरा, अनुप पारेख, सुधाकर सुंबे, गोपीनाथ सुंबे आदी दोषी आरोपींची नावे आहेत.