Ahmednagar News : कोपरगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर पंचनाम्यांचा फार्स झाला; पण अजूनही अनेक शेतकऱ्यांना कोणतीही नुकसानभरपाई मिळालेली नाही. येत्या ६ तारखेपर्यंत त्यांना पैसे द्या; अन्यथा ७ तारखेला रस्त्यावर उतरू, असा इशारा ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख प्रमोद लबडे यांनी एका निवेदनाद्वारे शासनाला दिला आहे.
शुक्रवारी (दि. १) रोजी प्रमोद लबडे यांनी तहसीलदार यांच्या दालनात जाऊन प्रांताधिकारी माणिकराव आहेर व तहसीलदार संदीपकुमार भोसले यांना निवेदन दिले. यावेळी नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते यादेखील होत्या.
निवेदन देताना जिल्हाप्रमुख प्रमोद लबडे, तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे उपजिल्हाप्रमुख असलम शेख, शहर प्रमुख सनी वाघ, माजी शहर प्रमुख भरत मोरे तालुका कार्याध्यक्ष गिरधर पवार, उपतालुका राजेंद्र नाजगड, तालुका समन्वयक मुन्नाभाई मन्सूरी आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले, की तालुक्यात गतसाली जून, ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीनंतर पंचनाम्याचा फार्स झाला. सुरेगाव पोहेगाव मंडळातील काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली; परंतु कोपरगाव, रवंदा, दहेगाव बोलका या तीन मंडळातील शेतकऱ्यांना अद्यापही भरपाई मिळालेली नाही.
६ तारखेपर्यंत त्यांना पैसे द्या; शेतकऱ्यांसमोर असलेल्या अडचणीविषयी लबडे यांनी प्रांताधिकारी माणिकराव आहेर व तहसीलदार संदीप कुमार भोसले यांच्याशी चर्चा केली व परिस्थितीचे गांभीर्य त्यांच्या लक्षात आणून दिले. यावर त्यांनी याबाबत सकारात्मक कारवाई करण्याची ग्वाही दिली असल्याचे लबडे यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना संकटात लोटणाऱ्या शिंदे सरकारच्या नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत शेतकरी असून अध्यापही शिंदे सरकारने तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली नसल्याने शेतकरी वर्गात कमालीचे संताप व्यक्त होत आहे.
राज्य शासनातील शिंदे सरकारने त्वरित आमच्या खात्यावर पैसे जमा करावे व आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी कोपरगाव तालुक्यातील शेतकरी वर्गा मधून होत आहे. अतिवृष्टीचे पैसे ६ सप्टेंबरपर्यंत मिळाले नाही,
तर ७ सप्टेंबरपासून वंचित शेतकऱ्यांसह ठाकरे शिवसेना तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार असल्याचा पुनरुच्चार जिल्हाप्रमुख लबडे यांनी निवेदनातून केला आहे