Ahmednagar News : नगर जिल्ह्यात शेअर मार्केट ट्रेडिंगच्या नावाखाली आजपर्यंत अनेकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. मात्र अद्याप देखील या घटनांतून नागरिकांनी फारसा बोध घेतला नसल्याचे एकंदरीत चित्र दिसत आहे. जिल्ह्यात सर्वात आधी व सर्वात जास्त शेवगाव तालुक्यातील नागरिकांची फसवणूक झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
नुकतीच शेवगाव तालुक्यातील दोन वेगवेगळ्या एजंटांनी तालुक्यातील अनेक नागरिकांना तब्बल दोन कोटीचा गंडा घातला असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या दोघांविरोधात शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, शेवगाव तालुक्यातील लाडजळगाव येथील वैभव ज्ञानेश्वर कोकाटे या एजंटाने शेअर मार्केट ट्रेडिंगच्या नावाखाली अनेकांना गंडा घातल्याचे समोर आले असून त्याचेविरोधात सुमारे दीड कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रवीण विक्रम बुधवंत (रा. शेवगाव) यांनी त्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
कोकाटे याने व्ही.के. ट्रेडिंग सोल्युशन नावाने शेअर मार्केट ट्रेडिंग व्यवसाय सुरू केला. तसेच एक लाख दिले तर प्रती महिना १० टक्के प्रमाणे परतावा देत असल्याचे बुधवंत यांना सांगितले. त्याच्या अमिषाला बळी पडून बुधवंत व त्यांच्या ओळखीच्या लोकांनी वेळोवेळी आरटीजीएस व रोख स्वरुपात पैसे ट्रान्सफर केले. दरम्यान, गुंतवणूक केलेली मूळ रक्कम, परतावा देण्यास टाळाटाळ करुन कोकाटे पळून गेला आहे.
तर दुसऱ्या घटनेत तेजस काकासाहेब तानवडे (रा. पिंगेवडी) यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरुन कानिफनाथ अशोक काजळे (रा. सोनविहीर) याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काजळे याने मोहटादेवी ट्रेडिंग कंपनी या नावाने कार्यालय सुरू करून परिसरातील नागरिकांना १६ टक्के प्रती महिना परतावा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केली.
काजळे याच्यावर विश्वास ठेऊन तानवडे यांनी ११ लाख रुपये रोख दिले होते. दीड महिन्यात परतावा म्हणून २ लाख रुपये तानवडे यांना परत दिले. त्यानंतर त्याने परतावा व मूळ रक्कम देण्यास टाळाटाळ केली. गावातील इतर सात ते आठ जणांकडून जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून एकूण ४९ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे. त्यानुसार शेवगाव पोलिसांकडून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.