Ahilyanagar News:- अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर विधानसभा मतदारसंघ सध्या डॉ. सुजय विखे पाटील आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्यामध्ये रंगलेल्या राजकीय कलगीतुरामुळे चांगलेच चर्चेत असल्याचे दिसून येत आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जर आपण कट्टर राजकीय विरोधक पाहिले तर ते प्रामुख्याने मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे आहेत. परंतु आता या सगळ्या राजकीय विरोधामध्ये यांची पुढची पिढी म्हणजेच डॉ.सुजय विखे आणि आमदार बाळासाहेब थोरात यांच्याकडून जयश्री थोरात यांनी उडी घेतल्याचे काही दिवसांपासून दिसून येत आहे.
संगमनेर मधून विधानसभा निवडणूक लढवण्याच्या दृष्टिकोनातून डॉक्टर सुजय विखे यांनी संगमनेर मतदारसंघांमध्ये जनतेच्या भेटीगाठी आणि अनेक गावांना जाऊन सभांचा धडाका लावला आहे. यामध्ये सुजय विखे आणि जयश्री थोरात यांच्यामध्ये आरोपांच्या फैरी झडताना दिसून येत आहेत.
या सगळ्या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द बाजारतळ या ठिकाणी माजी खासदार सुजय विखे यांनी महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी सभेचे आयोजन केलेले होते व या सभेच्या अध्यक्षस्थानी वसंतराव देशमुख होते.
वसंतराव देशमुख यांनी युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे गावातील महिला संतप्त झाल्या व त्यांनी सभाच उधळून लावली व त्यानंतर मोठ्या प्रमाणावर गोंधळ निर्माण होऊन संतप्त जमावाने दगडफेक व जाळपोळ केली असल्याची माहिती समोर आली आहे.
धांदरफळ गावातील महिलांनी उधळून लावली सभा
याबाबत सविस्तर वृत्त असे की,संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द बाजारतळ येथे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी सभेचे आयोजन केले होते व या सभेचे अध्यक्षस्थानी वसंतराव देशमुख होते.
त्यांनी युवक काँग्रेसचे अध्यक्षा डॉ.जयश्री थोरात यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे या गावातील महिला संतप्त झाल्यावर त्यांनी सभा उधळून लावली.त्यानंतर मात्र जमावाने या ठिकाणी दगडफेक व जाळपोळ केली.
वसंत देशमुख यांनी महिलांचा अत्यंत अवमानकारक उल्लेख करून समस्त महिला भगिनींचा अवमान केला केला आहे व यामुळे सभेमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले व हे ऐकताच धांदरफळ गावातील अनेक महिला एकत्र आल्या व त्यांनी सभास्थळी धाव घेतली.
सुजय विखे हे सूड भावनेने आणि अत्यंत गलिच्छ पद्धतीने वक्तव्य करत असल्याचा आरोप यावेळी महिलांनी केला. यामुळे झालेल्या गोंधळामुळे विखे यांनी भाषण आटोपते घेतले व देशमुख यांना देखील भाषण संपवण्यास सांगितले.
झालेली गंभीर परिस्थिती पाहता त्यांनी सभा संपवून निघण्याचा प्रयत्न केला. परंतु तेव्हा देखील महिलांनी सुजय विखे आणि देशमुख यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला व त्यानंतर गोंधळ उडाला.
सुजय विखे यांच्या ताफ्यातील गाडी फोडली
या सगळ्या प्रकारामुळे संतप्त झालेल्या जमावाने एक गाडी फोडल्याची देखील माहिती मिळाली असून घटना घडल्यानंतर विखे यांच्यासोबत लोणी कडे जाणाऱ्या ज्या गाड्या होत्या त्या संगमनेर तालुक्यातील तरुणांनी अडवल्या व यामुळे लोणी व राहता परिसरातील तरुण व संगमनेर तालुक्यातील तरुण यांच्यामध्ये बाचाबाची निर्माण झाली.
या सगळ्या प्रकारामुळे या परिसरामध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. सभेत गोंधळ घातल्या प्रकरणी विखे समर्थक हे तक्रार देण्यासाठी संगमनेर पोलीस ठाण्यामध्ये जमले होते.