स्मशानभूमीवरून अहमदनगरमध्ये दगडफेक ! मृताला सावडताना प्रकार, राख, अस्थी घेऊन लोक पोलीस ठाण्यात

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे स्मशानभूमीच्या वादातून सोमवारी (दि. ६) दोन गटांत दगडफेक व हाणामारीची घटना घडला. घटनेनंतर याप्रकरणी एका गटाने नऊ जणांविरोधात शिवीगाळ व दगडफेक करून राख सावडण्यास विरोध केल्याची तक्रार निवेदनाद्वारे बोधेगाव पोलिसात दिली.

तर दुसऱ्या गटाने विनयभंग व मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याबाबत अकरा जणांविरोधात शेवगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोधेगाव येथील गट नंबर १३१ मध्ये १० आर. क्षेत्र हे (खुटेकर) वीर समाजाची स्मशानभूमी आहे.

तेथे सोमवारी मयत तरुणाची राख सावडत असताना स्मशानभूमीत अतिक्रमण केलेल्या स्थानिकांनी दोन महिलांसह येऊन शिवीगाळ करत दगडफेक केली व राख सावडण्यास विरोध केल्याचे एका गटाने निवेदनाद्वारे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान, दुसऱ्या गटाकडून शेवगाव पोलिसात फिर्याद दिली. मी व माझे कुटुंबीय घरासमोर असताना घराच्या बाजूलाच असणाऱ्या स्मशानभूमीतून गावातील काही इसम धार्मिक विधी उरकून घरी जात असताना ते अचानक आमच्या घरी येऊन म्हणाले की, तुम्ही आमच्या स्मशानभूमीत अतिक्रमण केले आहे.

मी त्यांना आम्ही अतिक्रमण केलेले नाही, असे समजावून सांगत असताना त्याचा राग आल्याने या सर्वांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच सोबत असलेल्या महिलेचा विनयभंग केला, असे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी ११ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेहमी वादाचे प्रकार?
एका समाजाच्या स्मशानभूमीवरून वीर आणि रूपनर या दोन गटात नेहमी वाद होतात. स्मशानभूमीचा वाद कोर्टात होता. त्याचा निकाल वीर यांच्या बाजुने लागला. दरम्यान, आम्ही काहीही केलेले नाही. पोलीसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी रूपनर यांनी केली आहे.

मृताची राख व अस्थी..
घटनेची माहिती बोधेगाव पोलीस स्टेशनला देण्यासाठी येताना एका गटाने मृताची राख व अस्थी आणली. आमच्यावर दगडफेक व शिवीगाळ करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. सहाय्यक फौजदार राजू ससाणे आणि ग्रामस्थांनी मध्यस्थी केल्याने अस्थी आणि राख विसर्जनासाठी इतरत्र नेण्यात आली.