Ahmednagar News : नगर शहरातून मारहाणीसारख्या अनेक घटना मागील काही दिवसांपासून समोर येत आहेत. आता थेट पोलीस ठाण्यासमोरच दोन गटात दगडफेक झाल्याची घटना घडली आहे.
एकमेकांवर दगडफेक करून लोखंडी गजाने मारहाण केल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी तोफखाना पोलीस ठाण्यासमोर घडला असल्याची माहिती समजली आहे.
पोलीस ठाण्यात पूर्ववैमनस्यातून झालेल्या वादाची तक्रार देण्यासाठी दोन गट आले होते. त्यांच्यात पोलीस ठाण्यासमोरच राडा झाला.
याप्रकरणी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलिसांनी साहिल जावेद शेख (वय १९), अमीन शब्बीर शेख (वय २८), सोहेल युनुस शेख (वय २४), गणेश विलास ससाणे (वय २५), अनीश जाकीर शेख (वय २२), राजु रामेश्वर कांबळे (वय २२), रोहित मच्छिंद्र उल्हारे (वय २५),
अशोक नवनाथ लोंढे (वय २४) , रोहन काशिनाथ जगताप (वय १९, सर्व रा. रामवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
मंगळवारी सकाळी रोहित भागवत व रोहन गायकवाड यांच्यात पूर्ववैमनस्यातून वाद झाले व याची तक्रार देण्यासाठी ते दोघे तोफखाना पोलीस ठाण्यात आले होते.
पोलिसांनी दोघांची तक्रार घेत अदखलपात्र गुन्हे नोंदविले परंतु त्याच दरम्यान तक्रारदरांच्या बाजूने आलेल्या नऊ जणांनी तोफखाना पोलीस ठाण्याच्या बाहेर गोंधळ घालत एकमेंकावर दगडफेक केली.
लोखंडी गजानेही मारहाण झाली. पोलिसांनी परस्थिती हाताबाहेर जाण्याआधीच दोन्ही गटातील व्यक्तींना ताब्यात घेत त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदविला. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
नगर शहरात मागील काही दिवसांत अनेक मारहाणीच्या घटना समोर आल्या आहेत. यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण असून पोलिसांनी यावर वचक ठेवावं अशी मागणी नागरिकांतून होत आहे.