Ahmednagar News : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून तालुक्यातील सकल मराठा समाज आक्रमक झाला असून, गुरुवारी (दि.२६) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डी येथील सभेसाठी शेवगाव तालुक्यातून जाणाऱ्या बस ठिकठीकाणी अडवण्यात आल्या
तर कोळगाव येथे अज्ञात व्यक्तींनी एस.टी. बसची मागील काच फोडली तसेच या सभेसाठी जाणारे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष तथा प्रदेश चिटणीस अरुण मुंडे यांनाही भातकुडगाव फाटा येथे अडवून घेराव घालण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डी येथील सभेला जाण्यासाठी शेवगाव तालुक्यातून ५६ गाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती. त्यातील सुमारे ३५ गाड्या ठिकठीकाणी अडवण्यात आल्या.
भातकुडगाव फाटा परिसरात या आंदोलनाची तीव्रता अधिक होती. या गाड्या शेवगाव येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या आवारात काही वेळ लावण्यात आल्या, त्यातील काही गाड्या माका- मिरी मार्गे शिर्डीला रवाना झाल्या.
याच सभेसाठी मंगरूळ येथे नागरीकांना आणण्याकरिता चाललेल्या माजलगाव आगाराच्या (क्र.एम.एच.१४ बीटी२१५८ ) या बसची मागील बाजूची काच अज्ञात व्यक्तींनी कोळगाव शिवारात फोडली. याप्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.