कोरोना रूग्णांच्या जीवाशी चाललेला खेळ थांबवा;माजी आ.कोल्हे संतापल्या

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,5 ऑगस्ट 2020 :-कोपरगाव येथील कोरोना सेंटर वाढत्या रूग्णांना सेवा देण्यास अपुरे पडत आहे. त्यामुळे रूग्णांची हेळसांड होत आहे. त्यामुळे या रूग्णांच्या जीवाशी चाललेला खेळ थांबवा असा इशारा देत शिर्डी येथे तातडीने कोरोना सेंटर उभारावे अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव माजी आ.स्नेहलता कोल्हे यांनी केली आहे.

अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. संगमनेर, श्रीरामपूर पाठोपाठ कोपरगाव तालुकाही कोरोनाने व्याप्त होत चालला आहे. तालुक्यात कोरोनाने आपले पाय चांगलेच रोवले आहेत. आता कोरोनाची रुग्णसंख्या द्विशतकाकडे वाटचाल करत आहे. परंतु या वाढत्या रुग्णांमुळे खूप मोठा तणाव प्रशासनवर येत आहे.

सुविधा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. हाच धागा पकडत कोल्हे यांनी वरील मागणी केली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेशजी टोपे, पालकमंत्री हसनजी मुश्रीफ आणि जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना निवेदन पाठवून मागणी करण्यात आली.

निवेदनात म्हटले आहे, कोपरगाव विधानसभा मतदार संघामध्ये कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे रूग्णांची संख्या मोठया प्रमाणात वाढली आहे. येथील सदगुरू गंगागीर महाराज महाविद्यालयाच्या मुलींच्या वसतीगृहाच्या इमारतीत तात्पुरते कोविड सेंटर उभारण्यात आलेले आहे.

सध्या रूग्णांची संख्या वाढल्यामुळे त्याठिकाणी मुळातच कमी असलेल्या स्टाफवर अतिरिक्त ताण पडत असून अत्यावश्यक सेवेसाठीचे वैद्यकीय साहित्य उपलब्ध होत नसल्याने रूग्णांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यात एखादया रूग्णाची प्रकृती खालावल्यास त्या रूग्णास सुमारे 100 किलोमीटर लांब असलेल्या

अहमदनगर येथील जिल्हा रूग्णालयात न्यावे लागते. लांबच्या अंतरावर नेण्यासाठी रूग्णवाहिका उपलब्ध होऊन नेण्यापर्यंत बराचसा वेळ लागतो. त्यामुळे रूग्ण दगावण्याची शक्यता निर्माण होते. कोपरगाव पासून जवळच असलेल्या शिर्डी

येथील साईबाबा संस्थानच्या रूग्णालय वैद्यकीय सुविधा उपलब्ध असून रूग्णांना ऑक्सीजन, व्हेंटीलेटर व इतर वैद्यकीय सुविधा मिळणे सोयीचे होईल, याकरीता तातडीने शिर्डी येथे कोविड सेंटरची उभारणी करण्याची मागणी कोल्हे यांनी केली आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24