अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- सध्या एकीकडे शेतकरी मोठ्या नैसर्गिक संकटात सापडला आहे. मात्र दुसरीकडे महावितरणमार्फत नगर जिल्ह्यात सर्वच तालुक्यात वीजबिल वसुलीसाठी वीजतोडणी अभियान राबविण्यात येत आहे.
कोणतीही पूर्व सूचना नोटीस न देता शेतीपपंची बेकायदेशीपणे वीज तोडून कंपनीची पठाणी वीजबिल वसुली सुरू आहे. ही कारवाई थांबवावी अन्यथा महावितरण कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करणार असल्याचा इशारा अखील भारतीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन पटारे यांनी दिला आहे.
महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या निवेदनात पटारे यांनी म्हटले आहे की, सप्टेंबर, आक्टोबर महिन्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. खरीप पीक वाया गेले, सरकारी भरपाई तुटपुंजी, तीही मिळाली नाही.
त्यात कोणतीही पूर्वसूचना न देता होणारी विजबिलाची बेकायदेशीर वसुलीसाठी चालू असलेली वीजतोड मोहीम थांबवावी. दि. २५ आॅक्टोबर २०२१ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने बैलगाडी मोर्चा काढून वीजबिल वसुलीस स्थगिती मिळावी अशी मागणी केली होती.
तरी आता कांदा लागवडी आणि रब्बी हंगामात इतर पिकाच्या लागवडी चालू आहेत, खरीप हातचा गेला रब्बीचे पीक आल्यावर बिल भरू शकतो.
तोपर्यंत आपली अडवणूक करून बेकायदा वीज तोडून चालू असलेली वसुली थांबवावी. तोडलेली वीज जोडणी करून द्यावी अन्यथा शुक्रवारी ३ डिसेंबर २०२१ रोजी महावितरण कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पटारे यांनी दिला आहे.