अहमदनगर Live24 टीम, 15 ऑक्टोबर 2021 :- कोळसा तुटवड्यामुळे देशासह राज्यावर भारनियमनाचे संकट घोंगावत असताना मात्र दुसरीकडे नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात वीजचोरीच्या घटना घडत आहे.
मात्र तालुक्यात महावितरण विभागाच्या एका अजबच कारवाईची चर्चा सध्या रंगत आहे. नेवासा तालुक्यात वीजचोरचे मोठे प्रमाण असून सरासरी बिलाच्या माध्यमातून अधिकृत वीजजोड असलेल्यांकडूनच वीज चोरी करणार्यांच्या बिलाची रक्कम वसूल केली जात असल्याचे कटूसत्य समोर येत आहे.
त्यामुळे अधिकृत वीजजोड असलेल्या ग्राहकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अनेक खेडेगावांमध्ये आजही मोठ्या प्रमाणात विजचोरी होते.
यातच नेवासा तालुक्यामधील गावांमध्ये कित्येक वर्षांपासून अनेकांकडून आकडा टाकून विजेची चोरी करताना आढळून येतात. वीज कर्मचारी, अधिकारी यांच्या निदर्शनास ही गोष्ट येत असली तरी कुठलीच कारवाई होताना दिसत नाही.
मात्र दुसरीकडे नुकतंच वीज वितरण कंपनीने बिल भरले नाही म्हणून अनेक मीटर धारकांचे वीज कनेक्शन कट केले गेले. पण आकडा धारकांवर मात्र कोणतीही कारवाई नाही आहे.
याचाच अर्थ कि महावितरण कर्मचाऱ्यांच्या कृपेने गैरप्रकार करणाऱ्यांवर कृपा तर नियमितवीजबिले भरणाऱ्यांवर वक्रदृष्टी दाखवली जाते आहे. यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातो आहे.