अहमदनगर बातम्या

अहमदनगर ब्रेकींग: प्रवरा नदीपात्रात बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू

Published by
Ahmednagarlive24 Office

AhmednagarLive24 : प्रवरा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला. संकेत वाडेकर ( रा. मांडवे ता. संगमनेर) असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे.

ही घटना शहरातील गंगामाई घाटाच्या परिसरात घडली. नदीपात्रात अडकलेल्या अन्य तीन विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.

वाडेकर हा आपल्या सहकारी मित्रांसह काल सायंकाळी प्रवरा नदीपात्रात पोहण्यासाठी गेला होता. गंगामाई घाटाच्या परिसरात हे विद्यार्थी पोहण्याचा आनंद घेत होते. प्रवरा पात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळू तस्करी होत असल्याने नदीपात्रात मोठमोठे खड्डे पडलेले आहेत.

संकेत याला नदीपात्रातील खड्ड्यांचा अंदाज न आल्याने तो एका खड्ड्यात अडकला, त्याचा बुडून मृत्यू झाला. त्याचे अन्य तीन मित्रही नदीपात्रात आंघोळ करत होते. त्यांनाही नदीपात्राचा अंदाज आला नाही.

मात्र त्यांनी आरडाओरड केल्याने इतर नागरिकांनी त्यांना नदीपात्रातून सुखरूप बाहेर काढले. यामुळे ते बालंबाल बचावले आहेत. घटनेची माहिती मिळताच नगरपालिका व पोलीस खात्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले.

त्यांनी मयत संकेत याचा मृतदेह संगमनेर नगरपालिकेच्या कॉटेज हॉस्पिटलमध्ये नेला. याठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली. मांडवे येथील ग्रामस्थांना ही खबर मिळताच तेही संगमनेरात दाखल झाले. त्यांनी यावेळेस संताप व्यक्त केला

संगमनेर येथील एका महाविद्यालयात हे विद्यार्थी शिक्षण घेत होते. हे सर्वजण वसतिगृहात राहत होते. सायंकाळी ते पोहण्यासाठी गेल्यानंतर ही दुर्घटना घडली आहे. प्रवरा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाळू उपसा होत असल्याने नदीपात्रात मोठमोठे खड्डे पडले आहेत.

भंडारदरा धरणातून आवर्तन सोडल्यानंतर पाण्यामुळे नदीपात्रातील खड्ड्यांचा अंदाज येत नाही. यामुळे यापूर्वी अनेकांचा बळी गेला आहे. महसूल प्रशासनाने संबंधित वाळू तस्करांविरुद्ध कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

Ahmednagarlive24 Office