अहमदनगर बातम्या

विद्यार्थी शाळेत हजर पण गुरुजीच गैरहजर !

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : सध्या उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे जिल्हा परिषदेने शाळेच्या वेळेत बदल केला असून, शाळेची वेळ सकाळी ७ ते १२ अशी केली आहे. मात्र या वेळेला विद्यार्थी शाळेत हजर राहत असून गुरूजीच उशीरा शाळेत येत आहेत.

त्यामुळे या उशीरा शाळेत येणाऱ्या गुरूजींवर कारवाई करावी अशी मागणी पालक वर्ग करत आहेत.

दरवर्षी मार्च महिन्यात उन्हाच्या वाढत्या प्रभावामुळे लहान मुलांना त्रास होतो. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा शाळेच्या वेळेत बदल करून सकाळच सत्रात शाळा भरवल्या जातात. शाळेच्यावेळेत बदल केल्याने शिक्षकांना देखील सकाळी वेळेतच शाळेत येणे बंधनकारक असताना देखील नगर तालुक्यातील चिचोंडी पाटीलच्या जिल्हा परिषद शाळेत सोमवारी सकाळी ७ वाजता विद्यार्थी हजर झाले मात्र फक्त चार शिक्षकच हजर होते. त्यानंतर काही शिक्षक आले असे टप्याप्याने शिक्षकांनी शाळेला हजेरी लावली.

सकाळी शाळेची वेळ असल्याने मुलांच्या आगोदर काही मिनीटे तरी शिक्षकांनी शाळेत येणे अपेक्षीत असताना मात्र विद्यार्थी वेळेवर शाळेत येतात परंतु शिक्षकच शाळेच्या वेळा पाळत नसल्याची बाब यामुळे समोर आली आहे. तरी शाळेतील सीसीटिव्ही कॅमेरे चेक करुन जे गुरुजी उशीरा शाळेत आले आहेत त्यांच्यावर वरिष्ठ अधिकारी कारवाई करणार का? की नेहमीप्रमाणे पाठीशी घालतात. याकडे पालक वर्गाचे लक्ष लागले आहे.

सीसीटिव्ही कॅमेरे धुळखात पडून

चिचोंडी पाटील येथील जिल्हा परिषद शाळेत लोकसहभागातुन सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी सर्व साहित्य आलेले आहे. पडवीत व ग्राऊंडवर हे कॅमेरे बसवले देखील परंतु अद्यापही वर्गात सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले नाहीत.

त्यामुळे हे सर्व साहित्य धूळखात पडून आहे. हे का बसवले नाहीत की हे कॅमेरे बसवण्यास कोणी विरोध करत आहे. हे देखील पाहणे गरजेचे असून तसे असल्यास संबंधितावर कारवाई करावी. व तात्काळ विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी हे कॅमेरे बसवावेत.

शालेय कमिटी फक्त पदे मिरवण्यासाठीच का?

शाळेतील कामाकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच काही अडचणी असल्यास त्या स्थानिक पातळीवरच सोडवण्यासाठी प्रत्येक गावात शालेय व्यवस्थापन समितीची स्थापना करण्यात आलेली आहे.

मात्र या कमिटीतील पदाधिकाऱ्यांचे गुरुजी शाळेत वेळेवर येत नाहीत या गोष्टीकडे दुर्लक्ष कसे त्यामुळे असे वाटते की शालेय व्यवस्थापन समितीचे पदे हे फक्त मिरवण्यासाठी आहेत की काय? अशी शंका पालकांमधून उपस्थित होत आहे.

Ahmednagarlive24 Office