अहमदनगर बातम्या

12 Th Exam : बारावी परीक्षेसाठी विविध जिल्ह्यांतील विद्यार्थी पाथर्डीत दाखल, शहरातील सर्व लॉज हाऊसफुल्ल

Published by
Ahmednagarlive24 Office

12 Th Exam : बारावीच्या परीक्षेला हमखास पास करून देण्याची गैरटी देणाऱ्या तालुक्यातील विविध विद्यालयांतील (परदेशी पाहुणे) इतर जिल्ह्यांतील मुंबई,

पुणे, सातारा, जालना, परभणी, हिंगोली, नाशिक, कोकणातील काही जिल्ह्यांतून विद्यार्थी पाथर्डी शहरात मंगळवारी दाखल झाल्यामुळ शहरातील सर्व लॉज फुल्ल झाले आहेत.

शिक्षण विभागाने प्रांताधिकारी प्रसाद मते यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल व पोलिस विभागाच्या मदतीने बारा बैठे पथके व ६ भरारी पथके तयार करून कॉपीमुक्त परीक्षा अभियान राबविण्याचा चंग बांधला आहे.

तालुक्यात बारा परीक्षा केंद्रांवर (आज) बुधवारपासून बारावीची परीक्षा सुरू होत आहे. अनेक विद्यालयांचा कारभार हातामध्ये असलेल्या पिशवीतील कागदातून चालतो.

वर्षभरात शाळा खोली नाही, शिक्षक नाही, विद्यालयाचा फलक नाही, तरीही केवळ कागदोपत्री विद्यालय चालू असल्याचे दाखवून दोनशे ते तिनशे विद्यार्थी दहावी व बारावीच्या परीक्षेला बसविले जात असल्याचे तालुक्यात घडते आहे.

शिक्षण विभागातील काही अधिकाऱ्यांचे हात ओले केले की, या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसायला परवानगी दिली जाते.

असे सुमारे सहा ते सात विद्यालये तालुक्यात आहेत. त्यांना विविध राजकीय पक्षांकडून राजाश्रयदेखील मिळतो आहे. शाळा नसताना विद्यार्थी येतात कुठून, याची चौकशी वर्षभर का होत नाही.

मंगळवारी पाथर्डीत विविध जिल्ह्यांतून विद्यार्थी दाखल झाले आहेत. आम्ही बारावीच्या परीक्षेला आलो आहोत.

इथे हमखास बारावी पास करून देणारे विद्यालये आहेत. त्यांना पैसे दिले की मग फक्त परीक्षेला यायचे, पास हमखास होता येते, असे हे विद्यार्थी सांगतात.

बारावीत आम्हाला प्रात्यक्षिके, सहामाही परीक्षा, पुर्व परीक्षा, असे काहीच करावे लागत नाही. येथील सर्व लॉज बुक झाले आहेत.

लॉजवर रहायला जागा मिळेना, अशी अवस्था झाली आहे. बाबुजी आव्हाड महाविद्यालय, श्रीतिकोल जैन विद्यालय, एम.एम. निहाळी विद्यालय,

खरवंडी, मिरी, कोरडगाव, वसतंदादा, करंजी, तिसगाव, कासारपिंळगाव, तनपुरवाडी, मोहटे, अशा बारा केंद्रांवर ५१७७ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

बारा बैठे पथके तयार करण्यात आली आहेत. यामध्ये मंडल अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, शिक्षण विभागातील अधिकारी,

केंद्रप्रमुख, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, पशउधन विकास अधिकारी डॉ. जगदिश पालवे, गटविकास अधिकारी कांबळे,

प्रांताधिकारी प्रसाद मते, महसुल व पोलिसांचे पथके यांचा समावेश आहे, सहा भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. पोलिसांनी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार तालुक्यात कॉपीमुक्त परीक्षा हे अभियान सुरु केले आहे. भयमुक्त वातावरणात परीक्षा देता यावी, यासाठी उपाययोजना केली आहे.

गैरप्रकार आढळल्यास गैरप्रकार करणारे व त्यांना पाठीशी घालणारे संबधितांवर कारवाई केली जाईल. संबधित संस्थेला देखील सुचना केल्या आहेत.

जेथे गैरप्रकार घडतील तेथील केंद्र पुढील काळात काळ्या यादीत टाकले जातील व मान्यता रद्द केली जाईल. – प्रसाद मते, प्रांताधिकारी, पाथर्डी

Ahmednagarlive24 Office