अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :- ख्रिश्चन समाजातील विद्यार्थ्यांनी शिक्षण क्षेत्राममध्ये चांगल्या पध्दतीची गुणवत्ता प्राप्त केली आहे.
भविष्यात वेगवेगळ्या क्षेत्रात काम करताना समाजाची सेवा करण्यासाठीही पुढाकार घ्या असा संदेश जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील यांनी दिला.
नाताळ सणाच्या निमित्ताने लोणी येथील शारोन चर्चमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सौ.शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी ऑल इंडिया ख्रिश्चन कौन्सिलचे अध्यक्ष बाळासाहेब साळवे, सुभाष अमोलिक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात समाजातील गुणवंत विद्यार्थ्याशी संवाद साधताना सौ.विखे पाटील म्हणाल्या की,
लोणी आणि परिसरात निर्माण झालेल्या शैक्षणिक सुविधांमुळे सर्वच समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी मिळाल्या आहेत.
या संधीतून मोठे यश संपादन करण्याची कर्तबगारी विद्यार्थी दाखवित असल्याचा अभिमान सर्वांना असल्याचे त्यांनी आवर्जुन नमुद केले.
भविष्यात वेगवेगळ्या क्षेत्रात काम करीत असताना दायित्व म्हणून समाजाची सेवाही करा असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी बाळासाहेब साळवे यांचेही भाषण झाले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ.शिल्पा खंदारे, सुधिर गायकवाड यांनी केले तर सुयोग ब्राम्हणे यांनी आभार मानले. नाताळ सणाच्या निमित्ताने सामुहीक प्रार्थनाही संपन्न झाली.