Ahmednagar News : तेलंगणामध्ये उसाचे दर मागील तीन-चार वर्षांपासून ३३०० रुपये ते ३७०० रुपये प्रति टन आहे. त्यामुळे त्याच धर्तीवर अहमदनगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ३५०० रुपये प्रति टनाच्या पुढे दर द्यावा. जिल्ह्यात जो कारखाना ३५०० रुपये प्रति टनाच्या पुढे दर देईल,
त्या कारखान्यास ऊस उत्पादक आपला ऊस झोनबंदी कायदा रद्द झाल्याने देण्याच्या तयारीत आहे. कमी दर देणाऱ्या कारखान्यास ऊस उत्पादक ऊस देणार नाही, असा इशारा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.
कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यात ऊसाला 3500 रुपये प्रति टन ते 3700 रुपये प्रति टन दर देण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यालाही बेळगाव जिल्ह्याच्या ऊस दराची स्पर्धा करावी लागणार असल्यामुळे कोल्हापूर व सांगली जिल्हाही साडेतीन हजार रुपये दर देण्याच्या मानसिकतेत आहे.
तसेच बारा वर्षांपूर्वी 2008-9 च्या गाळप हंगामात साखरेचे दर 2200 रुपये प्रति क्विंटल असतांनी सहकार महर्षी भाऊसाहेब संतूजी थोरात कारखान्याने 2800 रुपये प्रति टन दर दिला. तर उर्वरित अहमदनगर जिल्ह्यातील कारखान्यांनी 2000 रुपये प्रति टन उसाचा दर दिलेला आहे.
आज रोजी साखर 3000 रुपये ते 3700 रुपये प्रति क्विंटल असून जागतिक बाजारातही साखरेचे दर 65 रुपये 66 रुपये प्रति किलो आहे. यावर्षी जिल्ह्यात तीनशे मिलिमीटर इतके कमी पर्जन्यमान झालेले असल्याने उसाचे उत्पादन प्रचंड घटलेले आहे.
मागील तीन वर्षे सरासरी जिल्ह्यात अडीचशे लाख मेट्रिक टन उसाची उपलब्धता होती. ती निम्म्यापेक्षाही जास्त घट होऊन अवघी 100 मॅट्रिक टनावर आलेली आहे. अहमदनगर जिल्ह्यात एकूण 23 साखर कारखाने गाळपासाठी सज्ज असून जिल्ह्याची गरज जवळपास 200 ते 225 लाख मेट्रिक टन आहे.
त्यामुळे जो कारखाना जास्तीचा दर देईल. त्या कारखान्यास ऊस उत्पादक आपला ऊस देणार आहे. जिल्ह्यातील सर्व कारखान्यांनी मागील गेल्या दहा वर्षापासून संगणमताने प्रति टन एक हजार रुपये दर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना इतर राज्याच्या तुलनेत व महसुली उत्पन्नाच्या आधारे कमी दिलेले आहेत.
सदर बाब ही ऊस उत्पादकांच्या लक्षात आली असून गाळप हंगाम 2023-24 साठी जिल्ह्यात कोणता कारखाना सर्वाधिक भाव देतो. याकडे उत्पादकांचे लक्ष आहे. पुणे जिल्ह्यात भीमा पाटस कारखाना ३५०० रुपये प्रति मेट्रिक टन दर देण्याच्या तयारीत असून सोलापूर (कळम) येथील नॅचरल शुगर 3700 रुपये प्रति मेट्रिक टन दर घोषित केलेला आहे.