Ahmednagar News : आज (२४ जानेवारी) पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास नगर कल्याण महामार्गवरून बस नगरच्या दिशेकडे येत होती.. उसाची ट्रॉली पलटी होऊन ऊस रस्त्यावर पडलेला होता… त्याला दुसरा ट्रॅक्टरवाला मदत करू लागला..
हे पाहून इको कार चालक कार थांबवून त्याचे पार्कींग लाईट लावून वाहनांना दिशा देण्यासाठी मदत करू लागला..पण तितक्यात..तितक्यात काळाने घाला घातला.. भरधाव बसने ट्रॅक्टर व इको गाडीस जोरदार धडक दिली..यात अहमदनगर जिल्ह्यातील सहा लोक मृत्यू पावले आहेत.
कल्याण-नगर महामार्गावर ढवळपुरी फाट्याजवळ भनगडेवाडी शिवारात एसटी बस, कार आणि ट्रॅक्टर या तीन वाहनांचा भीषण अपघात झाला. बुधवारी (२४ जानेवारी) पहाटे २.३० वाजता झालेल्या या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. मयतांमध्ये दोघे पारनेर तर तिघे संगमनेर तालुक्यातील, एक पाथर्डी तालुक्यातील आहे.
अधिक माहिती नुसार : महामार्गावर ऊस वाहतूक करणारा ट्रक्टर व ठाणे – मेहकर बस आणि इको गाडी यांची ढवळपुरी फाटया जवळ जोरदार टक्कर झाली. या दुर्घटनेत ६ जण ठार झाले आहे. मृतांमध्ये निलेश रावसाहेब भोर (वय 25 वर्ष रा. देसवडे, ता. पारनेर), जयवंत रामभाऊ पारधी (वय 45 वर्ष, रा. जांबुत ता. संगमनेर), संतोष लक्ष्मण पारधी (वय 35 वर्ष, रा. जांबुत ता. संगमनेर),
अशोक चिमा केदार (वय 35 वर्ष रा. जांबुत खुर्द ता. संगमनेर), प्रकाश रावसाहेब थोरात (वय 24 रा. वारणवाड़ी ता. पारनेर), सचिन कांतीलाल मंडलेचा (वय 40 वर्ष, रा. टाकळीमानुर, ता.पाथर्डी ) आदींचा समावेश आहे. सुयोग अंबादास आडसुळ (वय 25 रा. भनगड वाडी ता.पारनेर), देवेंद्र गणपत वाडेकर ( वय 27 वर्ष रा.देसवले ता. पारनेर), बद्रीनाथ विठ्ठल जगताप (वय 45 वर्ष ग्रामसेवक रा.लोणी, ता.शिरुर कासार, जि.बीड) हे जखमी झालेत.