अहमदनगर बातम्या

ऊसतोड कामगारांची कारखान्यांकडे जाण्याची लगबग सुरू

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑक्टोबर 2021 :- साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर येथील अनेक कुटुंबे ऊसतोडणीसाठी रवाना होतात.नुकतेच पाथर्डी तालुक्यातून ऊसतोड कामगारांची कारखान्यांकडे जाण्याची लगबग सुरू आहे.

हे सगळे सुरु असताना मात्र एक महत्वाचा प्रश्न अद्यापही प्रलंबितच आहे. सध्या जिल्ह्यासह राज्यातील साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू झाले आहेत. त्यामुळे ऊसतोडणी कामगारांची कुटुंबासह कारखाना गाठण्याची लगबग सुरू आहे.

कामगार कारखान्यांवर जात असल्याने तालुक्यातील ग्रामीण भागातील तांडे-वाड्या-वस्त्या ओस पडले आहेत. या वर्षी अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेला.

त्यामुळे अनेक कुटुंबे ऊसतोडीसाठी निघाले आहेत. आगामी पाच ते सहा महिने पोटाची खळगी भरण्यासाठी कामगारांना सातत्याने स्थलांतर करावे लागते.

दिवाळीपूर्वीच तांडे, वाड्या-वस्त्यांवरील ऊसतोडणी कामगारांचे साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाकडे लक्ष लागलेले असते. दरम्यान दर वर्षी सहा-सहा महिने होणारे स्थलांतर सामाजिक समस्या निर्माण करणारे आहे.

याशिवाय कामगारांच्या मुलांचा शैक्षणिक प्रश्‍न, घरातील वडीलधाऱ्यांची आबाळ, वैद्यकीय सुविधा, असे किती तरी प्रश्‍न प्रलंबित आहेत.

Ahmednagarlive24 Office