राहुरी शहरातील अप्पासाहेब बाळासाहेब ठोकळे या ३५ वर्षीय विवाहित तरुणाने काल मंगळवारी (दि.६) पहाटेच्या दरम्यान दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत माहितीनुसार, मिळालेल्या अप्पासाहेब बाळासाहेब ठोकळे (वय ३५) हा विवाहित तरुण राहुरी शहरातील माळी गल्ली, देसवंडी रोड परिसरात आपल्या कुटुंबासह राहात होता. अप्पासाहेब ठोकळे हा शहरातील अक्षय दूध डेअरी येथे सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी करत होता.
सोमवारी (दि.५) रात्री १२ ते सकाळी ८ पर्यंत अप्पासाहेब ठोकळे हा कामावर होता. काल (दि.६) रोजी सकाळी पावने आठ वाजेच्या दरम्यान दुसरा एक सुरक्षा रक्षक कामावर गेला होता. त्यावेळी अप्पासाहेब ठोकळे हा दूध डेअरी मधील पत्र्याच्या शेडला असलेल्या लोखंडी पाईपला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत दिसून आला. त्याने सुरक्षा रक्षक अधिकारी प्रवीण वाघमारे यांना माहिती दिली. वाघमारे यांनी ताबडतोब पोलीस ठाण्यात माहिती दिली.
अप्पासाहेब ठोकळे याने काल पहाटे पाच वाजेच्या सुमारास त्याच्या व्हॉट्सअॅपवर काही दुःखी स्टेट्स ठेवले. त्यानंतर त्याने गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन रुग्णवाहिका चालक रविंद्र देवगीरे व इतर तरुणांच्या मदतीने फाशी घेतलेल्या अप्पासाहेब ठोकळे याला खाली उतरवले.
त्याला राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात नेले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. दुपारी त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक अरुण ठोकळे, इस्माईल सय्यद, राजेंद्र बोरकर, जीवन गुलदगड आदींसह अप्पासाहेब ठोकळे यांचे नातेवाईक व मित्र परिवार उपस्थित होता.
या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून ठोकळे यांनी निश्चित कोणत्या कारणाने आत्महत्या केली, हे मात्र समजू शकले नाही. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक १२ वर्षीय मुलगी व एक १० वर्षीय मुलगा तसेच भाऊ, भावजय असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.