Ahmednagar News:श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार सुनील धोंडीबा मोरे (वय ५४) यांनी घरातील लोखंडी जिन्याला साडीने गळफास लावून घेत आत्महत्या केली.
वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून मोरे यांनी आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी राहुरी तालुक्यात मुळा धरणावरील पोलिस चौकीत भाऊसाहेब दगडू आघाव (वय ४९) यांनी बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या केली होती.
त्यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीनुसार एक अधिकारी आणि दोघा कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विभागीय चौकशीचे प्रकरण मिटविण्यासाठी दहा लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप आघाव यांनी केला आहे.
या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच दुसरी घटना घडली. बुधवारी दसऱ्याच्या दिवशी श्रीगोंदा तालुक्यात मोरे यांनी आत्महत्या केली. बेलवंडी पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांसोबत त्यांचे वाद झाल्याने ते रजेवर होते.
दोन दिवसांपूर्वी त्यांना पोलिस ठाण्यात बोलावून त्यांच्याकडील तपासाची कागदपत्रे जमा करून घेण्यात आली होती. तेव्हापासून ते तणावात होते, असा आरोप कुटुंबियांनी केला आहे.