Ahmednagar News : सध्या उन्हाचा कडाका वाढला आहे. यापूर्वी उन्हाळ्यात केवळ आरोग्य सांभाळावे लागत होते; परंतु आता चोरट्यांपासून आपापली घरे वाचवण्याची वेळ आलेली आहे. उन्हाळ्यात रोजगार मंदावल्याने तालुक्यातील ग्रामीण भागात शेती उपयोगी साहित्य चोऱ्यांसह शहरी भागात घरफोडीच्या घटनांमध्ये वेगाने वाढ होत आहे.
उन्हाळ्यातील रात्रीच्या उकाड्यापासून वाचण्यासाठी घराचा दरवाजा उघडा ठेवाल, तर आर्थिक फटका बसू शकतो. याशिवाय अनेकदा चोरटे धारदार वस्तूने वार करण्यासारखे प्रकारही करतात.
उन्हाळ्यात घराचा दरवाजा उघडे ठेऊन झोपणे किंवा घर लावून मोबाईल, पैशांचे पाकिट यांसारखा महागडा ऐवज सोबत, उशाला घेऊन झोपणे महागात पडू शकते. त्यामुळे नागरीकांनी काळजी घेण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी केले आहे.
मागील उन्हाळ्यात श्रीरामपूरात विविध भागात रात्रीच्या वेळी तब्बल १२ मोबाईल चोरी गेल्याच्या घटना घडल्या होत्या. या घटना दरवाजा उघडा राहिल्याने, खिडकी, गॅलरीचा दरवाजा उघडा ठेवल्याने घडल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. अनेकजण घराचा दरवाजा उघडा ठेऊन झोपतात. रात्रीच्या वेळी फॅन, कुलरपेक्षा बाहेरील हवा घेण्यासाठी नागरिक घराचा दरवाजा अर्धा उघडा ठेवणे किंवा गॅलरीचा दरवाजा पूर्ण उघडा ठेवतात. त्यामुळे चोरट्यांना घरात प्रवेश करणे सहज शक्य होते.
लग्नसराई व उन्हाळ्यातील सुट्ट्यांमुळे शहरातील अनेकजण घर, फ्लॅट बंद करून गावाकडे जातात. त्यामुळे शहरी भागातील कुलूप बंद घरे चोरट्याकडून लक्ष केले जात आहे. गेल्या आठवड्यात शहर परिसरात मोरगे वस्ती, नॉर्दन ब्रांच, आगाशे नगर परिसरात घरफोड्या झाल्या.
दरवर्षी उन्हाळ्यात बंद घरे फोडण्याच्या घटना वाढल्याचे दिसून येते. कुलूप बंद असलेली घरे फोडून अगदी काही मिनिटांच्या आत चोरी केली जाते. रात्रीच्या वेळी संशयित हालचाली वाटल्यास तात्काळ स्थानिक पोलीस स्टेशनला फोनद्वारे कळवावे, त्याकडे दुर्लक्ष करू नये.
नागरिकांनी पोलिसांना मदत केल्यास चोरीच्या, घरफोडीच्या घटनांना वेळीच आळा बसू शकतो. रात्रीच्यावेळी घरफोड्या करताना मोठा आवाज होतो. त्यामुळे दिवसा घरफोडीचे प्रमाणही वाढले आहे. आता चेहऱ्यावरून चोरांना ओळखता येत नाही. ते सेल्समन, कुरिअर, असा कुणाचाही वेश धारण करून येऊ शकतात.
मजबूत कुलूप लावले म्हणजे आपले घर सुरक्षित असल्याचा नागरीकांचा समज आहे; परंतु चावीशिवाय कुलूप उघडता येत नसले तरी कुलुपाची कडी दरवाजावर अवघ्या एक ते दीड इंचाच्या स्क्रूने बसविलेली असते. कटावनीने ही कड़ी कुलुपासकट सहज उचकटते. सेफ्टी डोअरचे बोल्टही कुचकामी असतात. त्यामुळे दरवाजा उचकटून घरात शिरणे चोरट्यांना सहज शक्य होते.
■ बाहेर जाताना मुख्य दरवाजाची कडी व कुलूप लावून जाऊ नये. घर बंद करून जाताना लॅच प्रकारातील कुलपाचा वापर करावा. रात्रीच्या वेळी बाहेरगावी जाणार असाल, तर घरामधील लाईट चालू ठेवावी. लग्नाला जाताना दागिन्यांचे जाहीर प्रदर्शन करू नये. काहीही कामधंदा करीत नसलेली तरुण मुले, व्यक्ती पॉश रहात असतील तर अशा लोकांवर लक्ष ठेवून पोलिसांना माहिती द्यावी.
■ आपल्या घर किंवा फ्लॅटच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरा लावावा, सीसीटीव्हीचे डीव्हीआर, एनव्हीआर सुरक्षित जागेत लपवून ठेवावा. अनेकदा चोरटे डीव्हीआरदेखील पळवतात. सुरक्षेचा भाग म्हणून सुरक्षारक्षक नेमावा. जास्तीचे सोने, नाणे, दागिने सुरक्षित बँकेत लॉकरमध्ये ठेवावे. बाहेरगावी जाताना सोने नाणे दागिने विश्वासू शेजारी किंवा नातेवाईक यांच्याकडे ठेवावे. रोकडऐवजी वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक व्यवहार पद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी केले आहे.
बाल गुन्हेगारांचा वापर
श्रीरामपूर शहरासह उत्तर नगर जिल्ह्यातील इतर तालुक्यांत दर महिन्याला सरासरी २० ते २५ घरफोड्या होतात. उन्हाळ्यात हा आकडा मोठ्या प्रमाणात वाढतो. त्यामुळे आपापल्या घरांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येकाने सावध राहिले पाहिजे.
घरफोड्या करण्यात आता परिस्थिती बदलली असून परराज्यातील चोर आणि बेरोजगार तरुण घरफोड्या करू लागले आहेत. यासाठी बाल गुन्हेगारांचाही वापर होत आहे.
वॉचमन, मोलकरणीची माहिती अत्यावश्यक
घराच्या, सोसायटीच्या सुरक्षेसाठी नेमलेला वॉचमन व मोलकरीण विश्वासार्ह असणे आवश्यक आहे. त्यांचा फोटो, पत्ता व त्यांची अन्य माहिती ठेवणे अत्यावश्यक आहे. सोसायटीत येणाऱ्या प्रत्येकाची माहिती, तो कुणाकडे आणि कशासाठी चालला आहे, याची माहिती वॉचमनने रजिस्टरला नोंद करावी.