अहमदनगर बातम्या

Agricultural News : उन्हाळ कांदा’ लागवडीची धूम ! ‘ह्या’ कारणामुळे बाहेरील मजूर आणून कांद्याची लागवड

Published by
Ahmednagarlive24 Office

पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव, आदिनाथनगर, हनुमान टाकळी परिसरात उन्हाळ कांद्याची मोठ्या प्रमाणावर लागवड होत असून, उर्वरित क्षेत्रात गहू व मकाची लागवड होत आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी रांगड्या कांद्याची कमी लागवड केली असली, तरी रोपवाटिकेनुसार उन्हाळ कांद्याची लागवड सुरू आहे.

त्यामुळे कांदा रोपांची मोठ्या प्रमाणावर कमतरता निर्माण झाली आहे. मजुरांची टंचाई असल्याने कांदा उत्पादक शेतकरी तालुक्यासह बाहेरीलही मजूर आणून कांदा लागवड करीत आहेत.

तालुक्यात प्रामुख्याने कांदा, ऊस, मका व गहू, ही नगदी पिके रब्बी हंगामात घेतली जातात. या सर्व पिकांच्या लागवड व काढणीचा हंगाम सुरू असून, त्यांच्या कामांना सर्वत्र गती मिळाली आहे.

भांडवलाअभावी तसेच पर्जन्यमान कमी झाल्याने बागायती पिकांची लागवड कमी झाली. परिसरात पाण्याची उपलब्धता असल्याने अनेक शेतकऱ्यांनी यावर्षी उन्हाळ कांदा व मकाची लागवड करणे पसंत केले आहे.

उन्हाळ कांद्याचा उत्पादन खर्च सामान्य शेतकऱ्यांना न परवडणारा आहे. गेल्या वर्षीच्या उन्हाळ कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी नाराज आहेत. कांद्याच्या भावाबाबत केंद्र व राज्य सरकार लक्ष देत नसल्याने शेतकरी जास्त आर्थिक फायदा करून देणाऱ्या मका पिकाकडे वळले आहेत.

शेतकऱ्यांनी शेतजमिनीची मशागत केली असली, तरी जमीन कांदा लागवड योग्य होण्यासाठी त्यावर रोटर फिरवावा लागतो. जमीन भुसभुशीत झाल्यानंतर वाफे तयार करण्यासाठी ट्रॅक्टर किंवा बैलांच्या यंत्रांचा उपयोग केला जातो. कांद्यासाठी तयार होणारी शेती येथेच थांबत नाही, तर त्यावर वाफे, माती लावून योग्य करण्यासाठी एकरी अडीच ते तीन हजार रुपये मजुरांना द्यावे लागतात.

दरवर्षी कांदा उत्पादक शेतकरी उसणवारी व दागदागिने बँकेत तारण ठेवून त्यावर पैसे मिळवून कांदा शेतीला भांडवल लावतात. हे सर्व करीत असताना कांदा काढणीनंतर कांद्याला भाव चांगला मिळाला, तर ठीक आहे. नाही तर शेतकऱ्यांच्या नशिबी पश्चातापच.

असे असले तरी शेतकऱ्यांना शेती केल्याशिवाय पर्याय नाही, म्हणून अपेक्षांचे ओझे उराशी बाळगून उन्हाळ कांद्याची लागवड सुरू आहे. शेतकऱ्यांना कांदा लागवडीसाठी एकरी १० ते ११ हजार रुपये मजुरीचा खर्च द्यावा लागत आहे. शेतातील कामासाठी मजुरांची टंचाई जाणवत असल्याने अनेक शेतकरी बाहेरील मजूर आणून कांद्याची लागवड करत आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office