अहमदनगर Live24 टीम, 27 डिसेंबर 2020 :- कोरोना विषाणूच्या पार्श्वभुमिवर निर्माण झालेली परिस्थिती तसेच गावपातळीवरील निवडणूकांमुळे घराघरांमध्ये होत
असलेला संघर्ष थांबावा यासाठी ग्रामपंचायतीच्या निवडणूका बिनविरोध करा व गावाला २५ लाखांचा निधी घ्या या आ. नीलेश लंके यांच्या आवाहनास त्यांच्या मतदारसंघात नवनागापूर ग्रामपंचायतीच्या रूपाने सर्वात मोठे यश आले आहे.
पारनेर नगर मतदार संघातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या नगर तालुक्यातील नवनागापूर ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय आमदार नीलेश लंके यांच्या उपस्थितीत नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला.
दरम्यान काही दिवसांपूर्वी आमदार लंके यांनी बिनविरोध निवडणुकीचं आवाहन केले होते. तसेच निवडणूक बिनविरोध झाल्यास संबंधित गावाच्या विकासासाठी आर्थिक निधी दिला जाईल अशी घोषणा केली होती.
दरम्यान आमदार लंकेच्या घोषणेला साथ मिळत असल्याचे दिसून येत आहे. शहरी भागास जोडून असलेल्या या ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करून आ. लंके यांनी आपली ताकद दाखवून दिली आहे.