अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-मंगळ दिनांक ८ डिसेंबर रोजी देशभरातील विविध संयुक्त शेतकरी आघाड्यांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या भारत बंदला अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचा संपूर्ण पाठिंबा असल्याचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी जाहीर केले आहे. याबाबत काळे म्हणाले की, देशामध्ये अभूतपूर्व असे शेतकरी आंदोलन इतिहासात पहिल्यांदाच चालू आहे.
दिल्लीच्या सीमेवरती लाखो शेतकरी कडाक्याच्या थंडीमध्ये आपल्या न्याय मागणीसाठी जीवाची पर्वा न करता तळ ठोकून आहेत. परंतु जाणीवपूर्वक कानावर हात ठेवलेल्या देशातल्या जुलमी भाजप प्रणित केंद्र सरकारला अजूनही त्यांची हाक ऐकू येत नाही. हे आंदोलन केवळ शेतकऱ्यांचे एकट्याचे नसून या देशातील शहरी भागातील प्रत्येक नागरिकाचे देखील आहे.
कारण सबंध मानवजात ही शेतकऱ्याच्या घामातून पीकणाऱ्या अन्नधान्यवर अवलंबून आहे. जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्याच्या अस्तित्वावर घाला घालणाऱ्या भाजपच्या काळ्या कायद्यांना त्यामुळे शहरातील नागरिकांचा देखील तेवढाच तीव्र विरोध आहे, हे मोदी सरकारने लक्षात घ्यावे असा इशारा काळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.
शहर जिल्हा काँग्रेसने या काळ्या कायद्यांच्या विरोधात नगर शहरात विविध निदर्शने, आंदोलने, सत्याग्रह त्याचबरोबर हजारो सह्यांची मोहीम राबवली आहे. महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश काँग्रेसने संगमनेर येथून आयोजित केलेल्या राज्यव्यापी किसान वर्च्युअल रॅलीमध्ये देखील शहर जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी,
कार्यकर्ते सर्व फ्रंटल ऑनलाईन सहभागी झाल्या होत्या. काळे म्हणाले कि, महसूल मंत्री प्रदेशाध्यक्ष ना.बाळासाहेब थोरात यांच्या सूचनेवरून सबंध राज्यातच काँग्रेसने बंदला पाठिंबा दिला आहे. प्रदेश काँग्रेसच्या आदेशावरून अहमदनगर शहर जिल्हा कॉंग्रेस देखील शेतकऱ्यांच्या बाजूने असून या आंदोलनाला आम्ही देखील पाठिंबा देत आहोत.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved