अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2021 :- देशात कृषी विधयेकावरून मोठा गदारोळ सुरु आहे. गेल्या अनेक दिवसांपासून याबाबत दिल्लीच्या सीमेवर लाखो शेतकरी आंदोलन करत आहे. या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळतो आहे.
नुकतेच या आंदोलनाला नेवासा तालुक्यातून देखील पाठिंबा देण्यात आला आहे. नेवासा तालुका अखिल भारतीय शेतकरी संघर्ष समन्वय समितीच्या वतीने दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नेवासा तालुक्यातील भेंडा ते कुकाणा व पुन्हा भेंडा अशी ट्रॅक्टर रॅली आयोजित केली आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांनी रॅलीत उपस्थित राहून दिल्ली, पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश या राज्यातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन समन्वय समितीने केले आहे.
याबाबत समन्वय समितीच्या वतीने पत्रकात सांगण्यात आले, की केंद्र सरकारने शेतकरीविरोधी केलेले काळे कायदे त्वरित मागे घ्यावेत, या प्रमुख मागणीसाठी देशातील २४० पेक्षा जास्त शेतकरी संघटनांनी आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे.
अखिल भारतीय शेतकरी संघर्ष समन्वय समितीच्या वतीने देशभर तिरंगा ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन २६ जानेवारी या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी राष्ट्रीय कार्यक्रम संपल्यानंतर होणार आहे.
त्यासाठीच २६ जानेवारी २०२१ रोजी नेवासा तालुका शाखेच्या वतीने भेंडा फॅक्टरी येथे शेतकरी बांधवांनी आपापल्या ट्रॅक्टर्ससह सकाळी १० वाजता जमावे, असे आवाहन ॲड. बन्सी सातपुते, बाबा आरगडे, अप्पासाहेब वाबळे, भारत आरगडे, कारभारी जाधव, ईश्वर पाठक, शरद आरगडे, गणेश खरात आदींनी केले आहे.