मारहाण भोवली.. शहरात कचऱ्याचे साम्राज्य

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :- कोरोनाच्या संकटमय काळात शहर स्वछतेसाठी झटणाऱ्या महानगरपालिकेच्या महिला कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याची घटना शहरात घडली होती.

या मारहाण प्रकरणामुळे संतप्त कामगार युनियनने या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी एकदिवसीय लाक्षणिक संप केला. त्यामुळे शहरातील कचरा उचलणे, तसेच झाडलोटची कामे बंद असल्याने शहरात अस्वच्छता होती. याप्रकरणी कामगार युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी आयुक्त श्रीकांत मायकलवार यांची भेट घेऊन घटनेची माहिती दिली होती.

तसेच कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याप्रकरणी कडक कारवाईची मागणी करण्यात आली. महानगरपालिकेत कंत्राटीसह सुमारे एक हजार सफाई कामगार आहेत. या कर्मचाऱ्यांनी महिला कर्मचाऱ्याला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ मंगळवारी एक दिवस लाक्षणिक कामबंद आंदोलन केले.

परंतु, कचरा कोंडी होऊ नये, यासाठी घंटागाड्यांच्या माध्यमातून घरोघर कचरा संकलनाचे काम सुरू होते. शहरातील साफसफाई न झाल्याने, तसेच इतर स्वच्छतेची कामे रखडल्याने शहरात अस्वच्छता दिसून आली.

याप्रकरणी आता पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे कर्मचारी आजपासून पुन्हा कामावर रूजू होणार आहेत. मनपा कर्मचाऱ्यांना मारहाण होण्याच्या घटना यापूर्वीही अनेकवेळा घडलेल्या आहेत. याप्रकरणात कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24