Ahmednagar News : नगर अर्बन बँकेच्या कर्ज घोटाळा प्रकरणी अटकेत असलेला सीए शंकर घनश्यामदास अंदानी याला न्यायालयाने २० फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून विविध माहिती समोर येत आहे.
यामध्ये सध्या बँकेचे तत्कालीन अध्यक्ष स्व. दिलीप गांधी यांचे कुटुंबीय संचालक असलेल्या मनसुख मिल्क प्रॉडक्ट्स व कर्जदार पटियाला हाऊस या दोघांशी अंदानी याचे सुमारे आठ लाखांचे संशयास्पद व्यवहार असल्याचा दावा आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयात केला असल्याची माहिती मिळाली आहे.
माजी संचालक राजेंद्र गांधी यांच्या फिर्यादीवरून दाखल गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करत आहे. उपअधीक्षक संदीप मिटके हे या गुन्ह्याचा तपास करत असून, त्यांनी सीए अंदानी याला बुधवारी रात्री अटक केली. त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर मिटके यांनी फॉरेन्सिक ऑडिटमधील आक्षेपांची माहिती दिली.
अंदानी याचा गुन्ह्यात सक्रीय सहभाग आहे. तो बँकेत स्विकृत तज्ञ संचालक होता. अंदानी याचे गुन्ह्यातील मुख्य आरोपी चेअरमन दिलीप गांधी (मयत) व इतर आरोपी कुटुंबीयांसमवेत जवळचे संबंध आहेत.
गांधी कुटुंबीय संचालक असलेल्या विरा लीड लाईट्स व मनसुख मिल्क प्रॉडक्ट्स या कंपन्यांचे ऑडीट रिपोर्ट त्याने केलेले आहेत. मेसर्स मनसुख मिल्क कंपनीच्या बँक खात्यावरून त्याच्या खात्यात २ लाख रुपये वर्ग झाले.
सीए विजयकुमार मर्दाच्या अडचणी पुन्हा वाढल्या
शहर बँकेतील कर्ज फसवणूक प्रकरणात सध्या सीए विजयकुमार मर्दा हा जामिनावर सुटलेला आहे. आता सध्या त्याचा अर्बन बँकेच्या कर्ज घोटाळा प्रकरणात सहभाग असतानाही त्याला वर्ग करून न घेतल्याचा आक्षेप बँक बचाव समिती व ठेवीदारांच्या वतीने न्यायालयात घेण्यात आला होता. याबाबत म्हणणे मांडताना सीए मर्दा याच्या शोधासाठी लूक आऊट नोटीस काढत असल्याचे तपासी अधिकारी मिटके यांनी सांगितले.