Ahmednagar News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दहा वर्षांची कारकीर्द चांगली असल्यामुळे तिसऱ्यांदा ते पंतप्रधान होणार आहेतच. त्यांचे हात बळकट करण्यासाठी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे रहा,
असे आवाहन भाजपाचे तालुका अध्यक्ष तुषार वैद्य यांनी केले. आ. मोनिकाताई राजळे, माजी आमदार नरेंद्र घुले यांच्या मार्गदर्शनाखाली या मतदारसंघातून एक लाखाचे मताधिक्य मिळेल, असा विश्वास वैद्य यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जगामध्ये भारताचा आदरयुक्त दबदबा निर्माण झाला आहे. राज्यामध्ये महायुती आहे. सगळ्यांच्या विचाराने सुजय विखे पाटील यांना नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातून उमेदवारी दिली आहे.
पारनेर विधानसभेचा लेखाजोखा घेऊन निलेश लंके यांनी मतदारसंघात यावे फक्त पोपटपंची करून निवडणूक जिंकता येत नाही, असा टोला त्यांनी लगावला. स्वाभिमान संवाद यात्रा हे फक्त जनतेची दिशाभूल करण्यासाठी काढलेली यात्रा असून,
त्यांच्याकडे सांगायला कोणतेही काम नाही. त्यामुळे खा. विखे यांच्यावर केवळ व्यक्तिगत टिका सुरू केल्याची टिका वैद्य यांनी केली.
मागील पाच वर्षात खा. विखे पाटील यांनी केंद्र व राज्य सरकारचा निधी आणून विकास काम केली. कोव्हीड संकटातही जनतेकरीता त्यांनी राबवलेल्या उपक्रमामुळे जनतेला मोठा दिलासा मिळाला.
विखे पाटील परिवाराची सामाजिक बांधिलकी मोठी असल्याने महाविकास आघाडीच्या उमेदवाराने कितीही बदनामी करण्याचा प्रयत्न केला तरी मतदारसंघातील सूज्ञ जनता त्यांना थारा देणार नाही, असा दावा त्यांनी केला.