अहमदनगर बातम्या

संभाव्य टंचाईसदृष्य परिस्थितीच्या निवारणासाठी यंत्रणांनी सज्ज रहावे-पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : पावसाळयामध्ये जिल्ह्यात झालेल्या अल्प पर्जन्यमानामुळे येत्या काळात जिल्ह्यातील संभाव्य टंचाईसदृष्य परिस्थितीच्या निवारणासाठी यंत्रणांनी सज्ज राहण्याचे निर्देश राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात टंचाईच्या परिस्थितीत करावयाच्या उपाययोजनांच्या अनुषंगाने आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री श्री विखे पाटील बोलत होते.


यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार प्रा. राम शिंदे, आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार मोनिका राजळे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर,

महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आमदार बबनराव पाचपुते हेही दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.


पालकमंत्री श्री विखे पाटील म्हणाले की, संभाव्य टंचाईसदृश्य परिस्थितीमध्ये टंचाई असलेल्या गावातील प्रत्येक नागरिकाला पाणी मिळावे यासाठी पाणी वितरणाचे वेळापत्रक निश्चित करण्यात यावे.

पाणी वाटपावेळी गावामध्ये तलाठी व ग्रामसेवकांनी उपस्थित राहून प्रत्येक नागरिकाला पाणी मिळेल यादृष्टीने कार्यवाही करावी. पाणी पुरवठ्यासाठी पाणी उद्भवाची निश्चिती करण्याबरोबरच उदभवातील पाणी वापरण्यासाठी योग्य आहे काय याबाबत पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करण्यात यावी.

पाणी वाहतुक करणाऱ्या टँकरची आतुन नियमितपणे स्वच्छता करण्यात यावी. नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा होण्याच्यादृष्टीने पाणी शुद्धीकरणासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात यावेत. उदभवातुन घेण्यात आलेले पाणी गावातील विहिरीमध्ये न टाकता गावांना पाण्याच्या टाक्या उपलब्ध करुन देण्यात याव्यात.

उपलब्ध पाण्याच्या काटकसरीने वापर करत कुठल्याही परिस्थितीत पाण्याचा अपव्यय होणार नाही याची काळजी घेण्याच्या सुचनाही पालकमंत्री श्री विखे पाटील यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.


संभाव्य टंचाईसदृश्य परिस्थितीमध्ये जिल्ह्यातील जनावरांना मुबलक प्रमाणात चारा मिळेल यादृष्टीने चाऱ्याचेही नियोजन करण्यात यावे. ज्या भागामध्ये जनावरांसाठी चाऱ्याची आवश्यकता भासणार आहे त्या ठिकाणी चाराडेपो सुरु करण्यात यावेत.

गावनिहाय टंचाई निवाराणाचा आराखडा तयार करण्यात येऊन प्रशासनाामार्फत देण्यात आलेल्या एसओपीचे तंतोतंत पालन करण्याचे निर्देशही पालकमंत्री श्री विखे पाटील यांनी यावेळी दिले.


यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींनी संभाव्य टंचाईसदृश्य परिस्थितीच्या अनुषंगाने उपयुक्त अशा सूचना केल्या. बैठकीस सर्व उप विभागीय अधिकारी, तहसिलदार यांच्यासह संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Ahmednagarlive24 Office