अहमदनगर Live24 टीम, 20 ऑक्टोबर 2021 :- अहमदनगर शहरातील काही खासगी शिक्षण संस्था शाळेचे शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी पालकांना नाहक त्रास देत असून, फी न दिलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यास बंद केल्याच्या निषेधार्थ मानस प्रतिष्ठानच्या वतीने शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांना निवेदन दिले आहे.
कोरोनामुळे शैक्षणिक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. यातच नगर शहरांमध्ये काही खासगी शिक्षण संस्था शैक्षणिक शुल्कासाठी काही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करत आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला आहे. मागील वर्षापासून कोरोनामुळे अनेकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहेत.
यासंकटामुळे काही पालकांना आपल्या पाल्यांची शैक्षणिक फी भरणे अवघड असताना काही शिक्षण संस्थांनी कुठलीही पूर्व सूचना न देता या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण बंद केले आहे. त्यामुळे अशा शिक्षण संस्थांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
केंद्र आणि राज्य सरकारकडून शैक्षणिक फी साठी कुणावरही दबाव टाकू नये असे निर्देश देण्यात आले असताना शहरातील काही खासगी शिक्षण संस्थानी सरकरच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. अशा खासगी शिक्षण संस्थेवर येत्या आठ दिवसात कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.
यावेळी मानस प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विशाल (अण्णा) बेलपवार यांच्यासह मंगेश मोकळ, समीर सय्यद, सलीम शेख, इम्रान सय्यद, विक्रम चव्हाण, प्रकाश बठेजा आदी उपस्थित होते.