प्रसंगी गोळ्या झेलू परंतू आता माघार नाही : जरांगे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : मी सरकारला मॅनेज होत नाही व फुटतही नाही, हीच सरकारची खरी अडचण आहे. साठ ते सत्तर वर्षे वेळ होता तेव्हा का आरक्षण दिले नाही, ७ महिन्यांचा वेळ दिला, आता लढाई आरपारची आहे.

गोळ्या झेलण्याची वेळ आली तरी चालेल. मात्र, आरक्षण घेतल्याशिवाय परत येणार नाही. सरकारने काही दगाफटका केला तर हे आंदोलन असेच ताकदीने सुरू ठेवा. सत्तेची धग व मस्ती कोणाच्या डोक्यात गेली असेल तर ती उतरविण्याची जबाबदारी मराठा समाजावर सोडा, असे आवाहन संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केले.

नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात आंदोलाकांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. तेथे आलेल्या हजारो मराठा युवकांशी संवाद साधताना जरांगे पाटील बोलत होते. ते म्हणाले, मी माझं कुटुंब बाजूला सारलं असून,

मराठा समाज हेच माझे कुटुंब मानतोय. आरक्षणाचा लढा शांततेत लढतोय. मात्र सरकार बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न करतयं. महाराष्ट्रात ५४ लाख लोकांच्या कुणबीच्या नोंदी सरकारला सापडल्या आहेत. मग हे प्रमाणपत्र का दिले नाहीत. हे प्रमाणपत्र तातडीने द्या.

मागासवर्गीय आयोगाचे भूत समोर करू नका, ते होईल तेव्हा होऊ द्या, ज्या कुणबी नोंदी सापडल्या त्यांना प्रमाणपत्र द्या. जनतेने दिलेल्या पाठबळावरच ही लढाई सुरू आहे. आरक्षण घेतल्याशिवाय मी परत येणार नाही. सरकारने काही दगाफटका केल्यास मागे राहिलेल्या लोकांनी काय करायचे ते तुम्ही ठरवा.

मी मरणाला घाबरत नाही. माझं जीवन मी समाजाला अर्पण केलयं. मेलो तरी चालेल, पण आरक्षणाचा गुलाल तुमच्या मुलांच्या डोक्याला लावल्याशिवाय राहणार नाही.