अहमदनगर Live24 टीम, 27 सप्टेंबर 2021 :- अद्याप कोरोनाचा धोका पूर्णपणे टळलेला नसतानाच आता नगर शहरात डेंग्यू, गोचीड तापाचे रुग्ण वाढत आहेत. सध्या शहरातील अनेक रुग्णालयांमध्ये या साथीच्या आजाराचे रुग्ण उपचार घेत आहेत.
त्यामुळे कोरोनाच्या पाठोपाठ डेंग्यू, गोचीड ताप या आजाराचा देखील नागरिकांना सामना करावा लागणार आहे. गेल्या काही दिवसांमध्ये नगर शहरात डेंग्यू आणि गोचीड ताप रुग्णांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहेत.
यात प्रामुख्याने ताप, अतिसार, उलट्या होणे, डोकेदुखी आणि सांधेदुखीसारखी लक्षणे दिसून येतात. गेल्या दोन आठवड्यांत या रुग्णांमध्ये वाढ दिसून आली आहे.
हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. साथीचे आजार वाढण्यामागे डासांची उत्पत्ती हे मोठे कारण आहे. शहरातील डेंग्यूचा प्रकोप पाहता शहरातील स्वच्छता यावर विशेष लक्ष देण्यात येत आहे.
डासांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असून मनपा प्रशासनाने अनेक ठिकाणी फॉगिंग मशीनद्वारे फवारणी केली असून मनपा प्रशासनाकडून डासांचे
उत्पत्ती केंद्र नष्ट करण्याचे काम सुरु असून डेंग्यूसारख्या आजारावर मात करण्यासाठी आरोग्य विभागाकडून तसे प्रयत्न करण्यात येत आहेत.