अहमदनगर बातम्या

निकृष्ठ दर्जाचे बी-बियाणे अथवा खतांची विक्री करणा-याविरुद्ध कठोर कारवाई करा – जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर, दि.22 जुन (जिमाका वृत्तसेवा) – खरीप हंगामात शेतक-यांना गुणवत्तापुर्ण व दर्जेदार बी-बियाणे, खते मिळतील याची कृषी विभागाने काळजी घ्यावी.

निकृष्ठ दर्जाचे बी-बियाणे अथवा खतांची विक्री करणा-याविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप हंगामाबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

त्याप्रसंगी जिल्हाधिकारी श्री.सालीमठ बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सुधाकर बोराळे,जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी निलेश कानवडे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ म्हणाले की, खरीप हंगामात सर्व शेतकऱ्यांनी कृषि निविष्ठा खरेदी करताना गुणवत्ता पूर्ण असल्याची खात्री करावी. खरेदीवेळी पक्के बील बियाण्यांची पिशवी व बियाण्यांचा एक छोटा नमुना जतन करुन ठेवावा.

फसवणूक झाली तर तात्काळ तक्रार निवारण कक्षाशी संपर्क करुन आपली तक्रार लेखी नोंदवावी. खरीपाच्या तयारीच्यादृष्टीने मुबलक प्रमाणात बियाणे व खतांचा साठा जिल्हयामध्ये उपलब्ध आहे.

तसेच खतांचा संरक्षित साठाही जिल्हयासाठी करण्यात आलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांना बळी नये. सद्यस्थितीत पाऊस लांबल्याने पेरणीची घाई न करता पुरेसा पाऊस झाल्यानंतरच सर्व शेतकऱ्यांनी पिकांची पेरणी करण्याचे आवाहन श्री. सालीमठ यांनी यावेळी केले. बैठकीस सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Ahmednagarlive24 Office