अहमदनगर Live24 टीम, 04 ऑक्टोबर 2021 :- श्रीगोंदा तालुक्यातील राजापूर येथे दोन महिन्यांपासून तलाठी येत नसल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. ग्रामस्थांचे अनेक काम तलाठ्याअभावी रखडली आहे.
यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. दरम्यान पूर्वीचे तलाठी जयसिंग मापारी यांची दोन महिन्यांपूर्वी बदली झाली. त्यांच्या जागी रामदास बडे यांची नियुक्ती झाली.
बडे दोन महिन्यांपासून गावात येत नसल्याने अनेकांची कामे रखडली आहेत. अनेकांना सात-बारा, वारस नोंदी, तसेच अन्य दाखल्यांबाबत अनेक अडचणी येतात. सध्या ई-पीकपाहणी व नोंदणीची कामे सुरू आहेत.
शेतकऱ्यांना याबाबत माहिती नाही, तसेच सध्या पावसाळ्याचे आणि कोरोना संकटाचे दिवस असल्याने शासकीय अधिकाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये, असे शासनाचे आदेश आहेत.
मात्र तरीही शासकीय अधिकारी कामाच्या ठिकाणी उपस्थित राहत नाहीत. त्यामुळे अनेकांची कामे खोळंबली आहेत. दरम्यान तलाठी कधी येणार आणि कधी रखडलेली कामे सुरु होणार याबाबत अद्यापही नागरिक साशंकच आहे.