Ahmednagar News : केडगाव परिसरातून आयशर टेम्पो चोरी करणाऱ्या आरोपीला कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी हा संभाजीनगर मार्गे जालन्याकडे टेम्पो घेऊन पसार झाला होता.
कोतवाली पोलिसांनी महामार्गावरील असलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे टेम्पोचा माग काढत आरोपीला बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे गाठले. हर्षल भगवान गंगातिरे ( वय ३२, रा. ता.दुसरबीड, जि. बुलडाणा) असे आरोपीचे नाव असून सहा लाख रुपये किमतीचा आयशर टेम्पो जप्त करण्यात आला आहे.
बबन संभाजी मेहेत्रे (रा. दिपनगर केडगाव, अहमदनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, हॉटेल रंगोली जवळ पार्क केलेला आयशर टेम्पो (एम एच १६ एई ८९३९) १२ सप्टेंबर रोजी चोरीला गेला होता.
चोरीला गेलेला टेम्पो संभाजीनगरमार्गे जालनाकडे गेल्याची माहिती कोतोलीचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक यादव यांनी गुन्हे शोध पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या होत्या.
कोतवाली पोलिसांनी महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे व तांत्रिकदृष्ट्या तपास करीत टेम्पो चोरी करणाऱ्या आरोपीची माहिती काढली. टेम्पोसह आरोपी हा बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे असल्याची माहिती मिळताच चिखली पोलिसांच्या मदतीने कोतवाली पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले.