Ahmednagar News : अहमदनगर मध्यम प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता, ज.म.पाटील यांनी दि. २४. रोजी शेवगाव तालुक्यातील ताजनापूर उपसा सिंचन टप्पा क्र. ०१ मधील वरूर, आखेगाव सह १० गावांच्या समावेशासाठी सर्वेक्षण करून प्रकल्प अहवाल सादर करण्यासाठी निविदा काढली असून,
जनशक्ती विकास आघाडी व वरील १० गावांतील शेतकऱ्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असल्याची माहिती लाडजळगाव गटाच्या मा.जि.प.सदस्या सौ. हर्षदाताई काकडे यांनी दिली आहे.
यावेळी बोलताना सौ. काकडे म्हणाल्या की, वरूर बु, वरूर खु. आखेगाव (डोंगर, तितर्फा ), खरडगाव, सालवडगाव, मुर्शदपूर, हसनापूर, थाटे, वाडगाव, या गावांना ताजनापूर लिफ्ट टप्पा क्र. १ चे पाणी मिळावे व सदर गावांतील बंधारे, गावतलाव भरून मिळावेत, या मागणीसाठी अधीक्षक अभियंता व प्रशासक लाभक्षेत्र विकास प्राधिकरण अहमदनगर यांचे कार्यालयावर ‘क्रांती दिनी’ दि. ९ ऑगस्ट २०२३ रोजी ‘प्रदक्षिणा व मुक्काम ठोको आंदोलन’ केले होते.
तसेच याच प्रश्नासाठी दि. १३ सप्टेंबर २०२३ रोजी जलसंपदा विभाग उत्तर महाराष्ट्र प्रदेश नाशिकचे मुख्य अभियंता श्री. मिसाळ यांना नाशिक येथे वरील गावांतील शेकडो शेतकऱ्यांनी समक्ष भेटून निवेदन दिले होते तसेच गोदावरी तीरावर गंगामातेची गोंधळ घालून पूजा करून ‘गंगामाई आमच्या शेतात ये’ अशी मागणी केली होती.
शेतकऱ्यांच्या या मागणीचा विचार होऊन शासनाने आता निविदा काढली आहे, याचा आनंद आम्हा सर्वांना होत आहे. तसेच आता या योजनेमधील गावांतील शेतकऱ्यांना आता पाणी मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. या योजनेमुळे दुष्काळी गावांतील शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे.
त्यांच्या शेतीचा, जनावरांचे चाऱ्याचा, पिण्याचे पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यास मदत होणार आहे. त्यामुळे हे सर्वेक्षण लवकरात लवकर पूर्ण करून संबंधित गावांतील शेतकऱ्यांनी सर्वेक्षणासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना सहकार्य करून आपल्या गावातील तलाव व बंधारे दाखवावेत, असे आवाहन सौ. काकडे यांनी शेतकऱ्यांना केले असून, अधिकाऱ्यांचे आभार मानले.