अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2021 :- मागील चार वर्षांपासून सत्ताधारी कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी विकासकामे होऊच दिली नाही.
मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत विकासकामांच्या निविदा नामंजूर करून त्यांनी जनतेवर अन्याय केला, असा आरोप करत राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस, मनसे आदी मित्रपक्षांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ लाक्षणिक निषेध आंदोलन करण्यात आले.
राष्ट्रवादीचे स्थायी समिती सदस्य नगरसेवक मंदार पहाडे यांनी सांगितले, स्थायी समितीच्या सभेत प्रमुख रस्त्यांच्या कामांबरोबर नागरिकांना दैनंदिन उपयोगात येणाऱ्या कोट्यवधींच्या विकासकामांच्या निविदा मंजुरीसाठी ठेवण्यात आल्या होत्या.
सभागृहात एक व बाहेर दुसरेच बोलणाऱ्या सत्ताधारी कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी या सर्व निविदा नामंजूर करण्यात धन्यता मानून शहराचा विकास थांबवला. आमदार आशुतोष काळे यांच्या सूचनेनुसार विकासात राजकारण करायचे नाही, या तत्वानुसार राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वोतोपरी सहकार्य केले आहे.
मात्र, ज्या जनतेने विकासासाठी बहुमत दिले, त्यांनी जनतेच्या अपेक्षांची राखरांगोळी करण्याची परंपरा कायम ठेवली आहे. कोल्हे गटाच्या नगरसेवकांना विकासकामांबाबत किती खोटा कळवळा आहे, हे नागरिकांसमोर येऊन यांच्या चेहऱ्यावरचे विकासाचे खोटे चेहरे उघड करण्यासाठी आम्ही हे आंदोलन केले आहे.
शहरातील चार कोटींच्या विकासकामांच्या निविदांना त्यांनी बहुमताच्या जोरावर स्थगिती दिली. याचा सर्वपक्षीय तर्फे जाहीर निषेध करण्यात आला.