अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:- वेतन करार संपून दोन वर्षे उलटली तरीही नव्याने करार होत नसल्याने एमआयडीसीतील इंडियन सिमलेस कंपनी आणि कामगार संघटनेत पगारवाढीवरून ताणाताणी सुरू आहे.
कामगार संघटनांनी कंपनी व्यवस्थापनाला 72 तासांचा अल्टीमेटम दिला असून बुधवारपासून संपाची हाक दिली आहे. एमआयडीसीतील इंडियन सीमलेस कंपनीची तीन युनिट आहेत.
स्टील उद्योग निर्मिती करणारी ही कंपनी आहे. कंपनी व्यवस्थापन दोन वर्षांपासून करार केलेला नाही. मागील वर्षी जानेवारी महिन्यात वेतन वाढ देऊ, असे आश्वासन दिले होते.
आता मात्र व्यवस्थापन मधली दोन वर्षे सोडून एप्रिल २०२१ पासून वाढ करू असे तोंडी सांगत आहे, त्यामुळे संपाचा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊननंतर कामगारांचा होणारा हा पहिलाच संप ठरणार आहे.
कंपनीला 72 तासांची नोटीस देण्यात आली आहे. मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर त्यानंतर बेमुदत संपावर जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.