अहमदनगर जिल्ह्यातील अपघातांच्या घटना काही कमी होण्याचे नाव घेईनात. अपघातांची मालिका सुरूच आहेत. आता आणखी एका भीषण अपघाताचे वृत्त आले आहे. ट्रकच्या चाकाखाली सापडून दुचाकीवरून जाणारी महिला ठार झाली आहे.
नीतू सोमनाथ परदेशी असे मृत महिलेचे नाव आहे. हा अपघात शनिवारी (दि.१३) सकाळी पावणेदहा वाजेच्या सुमारास संगमनेर शहरातून जाणाऱ्या जुन्या नाशिक-पुणे महामार्गावर घडला.
नीतू परदेशी यांना संगमनेर बसस्थानकाकडून शहरातील दिल्ली नाक्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकची धडक बसली. ही दुचाकी ट्रकच्या पुढील चाकाखाली अडकली आणि ट्रकच्या मागील चाकाखाली सापडून परदेशी गंभीर जखमी झाल्या. अपघातानंतर नागरिकांनी तेथे धाव घेतली.
परदेशी यांना खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु त्यांचा तत्पूर्वीच मृत्यू झाला होता. या प्रकरणी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.