अहमदनगर बातम्या

भीषण ! अहमदनगर – कल्याण महामार्गावर तिहेरी अपघात 8 ठार ! एकाच कुटुंबातील चौघांचा समावेश

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Kalyan Highway Accident : भाजीपाला घेऊन चाललेल्या भरधाव पीकअपने रिक्षा आणि ट्रकला जोरात धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, यात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. यातील चौघे मृत हे एकाच कुटुंबातील आहेत.

अहमदनगर कल्याण महामार्गावर डिंगोरे गावाजवळ रविवारी रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला आहे. ही धडक इतकी भीषण होती की, यात रिक्षाचा चालक, दोन प्रवासी, पिकअप चालक, कॅबिनमध्ये बसलेली त्याची पत्नी,

मुलगा मुलगी आणि मागे बसलेला हमाल यांचा जागीच मृत्यू झाला. गणेश मस्करे (30), कोमल मस्करे (25), हर्षद मस्करे (4), काव्या मस्करे (6), अमोल मुकुंदा ठोके, नरेश नामदेव दिवटे (66), अन्य दोघे (नाव माहित नाहीत) अशी मृतांची नावे आहेत.

ओतूरवरुन कल्याणच्या दिशेने हा भाजीपाल्याची भरलेला पिकप चालला होता. त्याचवेळी कल्याणकडून ओतूरकडे प्रवासी रिक्षा आलेली होती. डिंगोरे- पिंपळगाव जोगा गावच्या सीमेवर नगर कल्याण हायवे रोडजवळ असणाऱ्या पेट्रोलपंपा समोर या दोघांची जोराची धडक झाली.

भाजीचा पिकअप हा प्रचंड भरधाव आलेला होता. त्यामुळे हा अपघातही इतका भीषण झाला की, आठ जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी गर्दी केली. पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले.

आठही जणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून इतर मदतकार्य रात्री उशिरापर्यंत सुरु होते.

Ahmednagarlive24 Office