अहमदनगर बातम्या

बिबट्यांची दहशत ! बिबट्याचा मुक्त संचार मोठ्या प्रमाणात वाढल्याने घराबाहेर पडणे मुश्किल

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : कोपरगाव तालुक्यातील देर्डे कोहळे परिसरात बिबट्याचा मुक्त संचार मोठ्या प्रमाणात वाढला असून येथील जनजीवन घबराटीचे झालेले आहे.पाळीव कुत्रे, शेळ्या, कोंबड्या यावर रात्री अपरात्री बिबट्या ताव मारीत असल्याने घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे.

त्यामुळे राज्याचे वनमंत्री यांनी येथील बिबट्याची दहशत कमी करण्यासाठी तातडीने आवश्यकता उपाययोजना करून पिंजरा लावून बिबट्याचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष अरुणराव येवले यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

याबाबत माजी सरपंच साहेबराव शिंदे म्हणाले की, माझे मर्यादित कुटुंब आहे, बिबट्याचा मुक्त संचार या परिसरात वाढल्याने मनामध्ये भीती तयार झाली आहे. कोपरगाव वन विभागाच्या अधिकारी, पोलीस स्टेशन तसेच प्रांताधिकारी शिर्डी यांच्याकडे पिंजरा लावून बंदोबस्त म्हणून मागणी केली.

त्यावर संबंधित वनविभागाने असमर्थता दर्शवली आहे. परिसरातील बिबट्याना येथे नेहमीची ये-जा करण्याची सवय झाल्याने आम्हाला घराबाहेर पडणे देखील मुश्किल झाले आहे.

तसेच अरुणराव येवले म्हणाले की, बिबट्याच्या दहशतीमुळे शेतातील कामे खोळंबलेली आहेत. कष्टकरी, शेतमजूर, दूध उत्पादक, शेतकरी, महिलांसह अबाल वृद्धांना तसेच शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये भीती वाढली आहे.

भाजपाच्या नेत्या स्नेहलता कोल्हे यांना याबाबत कल्पना देण्यात आली असून त्यांनीही प्रशासकीय यंत्रणेच्या कानावर या संकटाची माहिती देऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा म्हणून मागणी केली आहे.

मात्र, अद्याप बिबट्याचा बंदोबस्त अजूनही झालेला नाही. येथील वन विभागाचे अधिकाऱ्यांनी बिबट्याला मारता येत नाही. तसेच पकडण्यासाठी पिंजरे देखील लावण्याची परवानगी नाही, असे सांगून हात वर केलेले आहे.

त्यामुळे या परिसरात निर्माण झालेले बिबट्याचे संकट कसे दूर होणार हा कायमचा प्रश्न आहे.तेव्हा थेट वन मंत्री यांनी या प्रकरणात लक्ष घालावे, तसेच जिल्हाधिकारी यांनी या भागातील दैनंदिन जीवनमान अधिक सुरळीत कसे होईल हा प्रयत्न करावा व बिबट्यापासून कायमची मुक्तता करावी, अशी मागणी अरुण येवले यांनी केली आहे.

Ahmednagarlive24 Office