Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला असून गेल्या पंधरा दिवसात बिबट्यांच्या हल्ल्यात तीन लहान बालकांचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर उपवनसंरक्षक सुवर्णा माने यांनी ऊसतोड कामगारांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
जिल्ह्यात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. उसाचे क्षेत्र मोठे असून उसाचे शेत हे बिबट्यांचे अधिवास बनलेले आहे. लोणी, संगमनेर, श्रीगोंदा येथे बिबट्याच्या हल्ल्यात बालकांना जीव गमवावा लागला आहे.
ऊस तोडीचा हंगाम सुरू असून ऊसतोड करताना शेतकरी मजुरांनी आवश्यक ती काळजी घ्यावी. ऊसतोड सुरू असताना ऊसतोड कामगार तसेच शेतकऱ्यांनी आपल्या लहान मुलांना सुरक्षित ठिकाणी ठेवावे.
ऊसतोड सुरु असलेल्या भागात मजुरांची मुले त्याच परिसरात खेळत असतात. अशा ठिकाणी हातात घुंगराची काठी घेऊन मोठ्या व्यक्तींनी थांबावे. त्यामुळे बिबटया दिसल्यास मुलांचे रक्षण करता येते. खाली वाकून ऊसतोड करू नये.
अशा वेळी दुसरा प्राणी असल्याचे समजून बिबट्याचा पाठमोरा हल्ला होऊ शकतो. तसेच ऊसतोड करताना मजुरांनी समूहाने एकत्रित काम करावे. वनविभागाच्या वतीने नागरिक व बालकांच्या संरक्षणासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात येत आहे.
बिबट्यांचा वावर असलेल्या भागात वनअधिकारी तसेच कर्मचारी वॉच ठेवून आहेत. काही भागात पिंजरे ही लावलेले आहेत. तरी नागरिक, शेतकरी, ऊसतोड कामगार यांनी स्वतः व कुटुंबाची, लहान बालकांची काळजी घेण्याचे आवाहन सुवर्णा माने यांनी केले आहे.