Ahmednagar News : नगर शहरातील मार्केट यार्ड परिसरात चाकूचा धाक दाखवून रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांना लुटण्याची घटना घडलीये. प्रवाशांच्या खिशातील पैसे बळजबरीने काढून घेऊन लुटल्याचा प्रकार घडलाय.
शनिवारी (दि. १०) सकाळी मार्केट यार्ड परिसरात हा प्रकार घडला असून कोतवाली पोलीस ठाण्यात गणेश म्हसोबा पोटे उर्फ टिंग्या (रा. कानडे मळा, मार्केट यार्ड, नगर) याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
राजू ज्ञानदेव खैरे (वय ३२ रा. आशिर्वाद कॉलनी, सारसनगर) यांनी फिर्याद दिली आहे.
गणेश म्हसोबा पोटे उर्फ टिंग्या (रा. कानडे मळा, मार्केट यार्ड, नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या लुटारूचे नाव आहे. खैरे हे त्यांच्या दुचाकीवरून मुलीला शाळेत सोडण्यासाठी माळीवाडा येथे जात असताना मार्केट यार्ड समोर टिंग्या पोटे याने त्यांना हात करून थांबविले.
तो खैरे यांच्या ओळखीचा असल्याने ते त्याच्या जवळ थांबले. त्याने खैरे यांना शिवीगाळ करून त्यांच्याकडे पैशाची मागणी केली. खैरे यांनी त्याला समजून सांगितले असता त्याने कमरेला खोसलेला चाकू काढून धाक दाखवून खिशातील दोन हजार रुपये काढून घेतले.
‘यापुढे देखील तु मला महिन्याला पाचशे द्यायचे नाहीतर तुला बघून घेईल’, अशी धमकी दिली. तसेच खैरे यांच्या ओळखीचे आसिफ ताजुद्दीन शेख (वय २९ रा. गणेश चौक, बोल्हेगाव फाटा) यांना देखील टिंग्या पोटे याने साडेआठच्या सुमारास राजधन हॉटेल, मार्केट यार्ड येथे अडविले.
शेख हे कामावर जात असताना टिंग्याने त्यांना चाकूचा धाक दाखवून मारहाण केली. खिशातील एक हजार ८०० रुपये काढून घेतले व ‘तू मला महिन्याला पाचशे द्यायचे नाहीतर तुझ्याकडे बघतो’, अशी धमकी दिली.
खैरे व शेख यांनी कोतवाली पोलीस ठाणे गाठून सदरचा प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी खैरे यांच्या फिर्यादीवरून टिंग्या पोटे विरोधात गुन्हा दाखल केला आहे.