अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :- वाढदिवसाचा फ्लेक्स बोर्ड लावत असताना एका युवकाला विजेचा धक्का बसून त्यातच त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सावेडी उपनगरातील प्रोफेसर कॉलनी चौकात घडली.
सौरभ सुरेश चौरे (वय २२, रा. नालेगाव) असे त्या मृत युवकाचे नाव असून गुरुवारी पहाटे ही घटना घडली. प्रोफेसर कॉलनी चौकात सौरभ हा युवक गुरुवारी पहाटे वाढदिवसाचे फ्लेक्स लावत असताना त्याला विजेचा धक्का लागला.
यामुळे तो जमिनीवर कोसळला. त्याच्या डोक्याला मार लागला होता, त्याला उपचारासाठी तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ व एक विवाहित बहिण असा परिवार आहे.
दरम्यान, सौरभ ज्या लोखंडी कमानीवर फ्लेक्स बोर्ड लावण्यासाठी चढला होता, ती कमान महापालिकेने जाहिरात फलक व दिशादर्शक फलक लावण्यासाठी उभारलेली आहे.
महापालिकेने खाजगी ठेकेदारीतून शहरात विविध ठिकाणी मोठ्या लोखंडी कमानी उभारून दिशा दर्शक फलक तसेच विविध जाहिराती लावण्यासाठी परवानगी दिली आहे. मात्र या कमानी उभारताना सुरक्षेच्या दृष्टीने दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.