Ahmednagar News : माझ्या राजकीय आयुष्यातील सर्वात ऐतिहासिक दिवस आजचा आहे. खंडकरी शेतकऱ्यांच्या जीवनातील नवा अध्याय आजपासून सुरू होणार आहे. या जमिनींसाठी वर्षानुवर्षे संघर्ष झाला.
राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर या प्रश्नाचा आपण व्यक्तिशः पाठपुरावा केला. शेतकऱ्यांची बाजू भक्कमपणे मांडली. त्यामुळेच मंत्रीमंडळात या जमिनी भोगवटा वर्ग दोन मधून एक करण्याचा निर्णय होऊ शकला.
मात्र शेतकऱ्यांवर कोणताही आर्थिक भार येवू नये ही भूमिका आपण कायम ठेवल्यामुळेच विनामोबदला या जमिनी शेतकऱ्यांच्या नावावर होऊ शकल्या. असे प्रतिपादन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष पुढाकाराने राहाता तालुक्यातील सुमारे २ हजार ३०५ शेतकऱ्यांच्या जमिनी नावावर करून त्याचे ७/१२ उतारे सुपूर्त करण्यात आले. १४ गावांमधील खंडकरी शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्या नावावर झाल्या.
५० टक्के नजराणा कमी झाल्याने या शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा लाभ झाला आहे. तसेच सार्वजनिक हितासाठी शेती महामंडळाच्या जमिनीही देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.
यावेळी आ. आशुतोष काळे, प्रांताधिकारी माणिकराव आहेर, तहसीलदार अमोल मोरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, शेती महामंडळाचे प्रदीपकुमार पवार यांच्यासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
तालुक्यात आयोजित कार्यक्रमात ना. विखे पाटील म्हणाले, यापूर्वी जिल्ह्याला महसूल मंत्रीपद मिळूनही खंडकरी शेतकऱ्यांना न्याय मिळू शकला नाही. शेतकऱ्यांना जमिनी मिळाव्यात ही भावनाच त्यांची नव्हती.
अशी टीका त्यांनी आमदार बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता केली. महायुती सरकारमुळे जमिनी भोगवटा वर्ग एक करून विनामोबदला शेतकऱ्यांच्या नावावर करण्याचा ऐतिहासिक निर्णय होऊ शकला.
अनेक वर्षे चाललेल्या या संघर्षात शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महसूलमंत्री म्हणून योगदान देता आल्याचे समाधान मोठे असल्याचे प्रतिपादन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
राज्यातील महायुतीचे सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठीच काम करीत असून,आता वीजबिल माफीचा निर्णय सरकारने घेतला. एक रुपयात पीकविमा योजनेमुळे जिल्ह्याला ११६५ कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे.
राहाता तालुक्यातील शेतकऱ्यांना १२१ कोटी रुपये मंजूर झाल्याची माहितीही ना. विखे पाटील यांनी दिली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्येही जिल्ह्यातील ५४ हजार महिलांनी सहभाग घेतला.
महसूल पंधरवड्याच्या निमित्ताने शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचण्यास मोठी मदत झाली आहे. पशुसंवर्धन पंधरवडा सुध्दा पशुपालकांच्यादृष्टीने महत्वपूर्ण असून पशुधनाच्या संवर्धनासाठी सर्वतोपरी निर्णय केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.