अहमदनगर Live24 टीम, 26 ऑक्टोबर 2021 :- लष्करात नोकरीला असल्याचा बनाव केल्याप्रकरणी लोणी (ता. राहाता) येथील एका युवकाला लष्करी अधिकाऱ्यांनी रविवारी पकडले. त्याला भिंगार पोलिसांच्या ताब्यात देत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. महेश भारत जगताप (रा. लोणी ता. राहाता) असे या युवकाचे नाव आहे. त्याच्यावर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका खासगी संस्थेत कामाला असताना त्याचे एका मुलीसोबत प्रेम जुळले होते. पण सरकारी नोकरी लागली तरच मी तुझ्याशी लग्न करेल, असे तिने म्हटले होते.
जगताप याने लष्कराचा गणवेश खरेदी केला. त्यावर मेजर असे नाव होते. त्या गणवेशातील फोटो त्याने प्रेयसीला पाठवला. पण, तिने जेथे नोकरी करतो त्या ठिकाणचे फोटो पाठवण्यास सांगितले.
त्यामुळे जगताप घालून लष्करी परिसरात गेला. तेथे संशय आल्याने लष्कराच्या अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी केली. त्याने दाखवलेले ओळखपत्र बनावट होते, त्यामुळे अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले. त्याला भिंगार कॅम्प पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्यानंतर जगताप विरोधात गुन्हा दाखल झाला.