अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2021 :- खुनाच्या गुन्ह्यातील अटक आरोपीस हॉस्पिटलमधून औषधोपचार घेऊन परत येत असताना पोलिसांना गुंगारा देऊन पळून जाणार्या सराईत आरोपीस जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेस यश आले असून सदर आरोपीस श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
श्रीरामपूर तालुका पोलिसांच्या ताब्यातील सचिन नेमजी काळे (मुठेवाडगाव, ता. श्रीरामपूर) हा आरोपी खुनाच्या गुन्ह्यात अटक आहे. हेडकॉन्स्टेबल दत्तात्रय शिवाजी शिंदे यांच्या फिर्यादीवरून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल आहे.
आरोपी सचिनला श्रीरामपुरातील ग्रामीण रुग्णालयात तपासणी व औषधोपचारासाठी आणण्यात आले होते. तेथून घेऊन जात असताना श्रीरामपूर ते हरेगाव रस्त्यावर वाहनाचा वेग कमी झाल्याचा फायदा घेत तो मागील दरवाजा उघडून बेडीतील हात सोडून पळाला.
आरोपीचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांनी स्वतंत्र पथक नेमले होते. दरम्यान गुप्त बातमीदारांमार्फत पोलिसांना माहिती मिळाली की, आरोपी नारायणगाव (पुणे) येथे राहत आहे. त्यानुसार पोलीस पथकाने सापळा लावून आरोपीला ताब्यात घेतले. पुढील कार्यवाही श्रीरामपूर शहर पोलिस करत आहेत