Ahmednagar News : श्रीगोंदा तालुक्यातील म्हातारपिंप्री येथील नरेंद्र सयाजी वाबळे यांचा खून केल्याप्रकरणी गुन्ह्यातील आरोपी राजू बबन शिरवाळे रा. म्हातारपिंप्री याला श्रीगोंदा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश मुजीब एस. शेख यांनी जन्मठेप आणि दंडाची शिक्षा सुनावली.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि. २० जुलै २०२० रोजी सायंकाळी ६ ते ७ वाजण्याच्या सुमारास मयत नरेंद्र सयाजी वाबळे हे म्हातारपिंप्री येथील त्यांच्या राहत्या घरी असताना आरोपी राजू बबन शिरवाळे याने त्यांना पाईपलाईनचे हुसासे कोणी तोडले याबाबत खरे खोटे करण्यासाठी
सुरसिंग वाबळे यांच्या म्हातारपिंप्री गावच्या शिवारात असलेल्या गट नं. ९३ मधील उसाच्या शेतात नेऊन कुन्हाडीने नरेंद्र वाबळे यांच्या डोके, कपाळ व डोळ्यावर मारहाण करून त्यांचा खून करत श्रीगोंदा पोलिस ठाण्यात हजर होऊने नरेंद्र बावळे यांचा कुऱ्हाडीने खून केल्याचे सांगितले.
या प्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात विजय नरेंद्र वाबळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल होऊन राजु बबन शिरवाळे याला गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. सहा. पो. नि. एस. एच. गावित यांनी गुन्ह्याचा तपास करून आरोपी विरुध्द जिल्हा न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले होते.
सरकार पक्षाच्या वतीने एकूण १९ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. या खटल्यामध्ये फिर्यादी, वैद्यकीय अधिकारी, पंच, स्वतंत्र साक्षीदार तपासी अधिकाऱ्यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. न्यायालयासमोर आलेले साक्षी पुरावे व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने
आरोपीस कलम ३०२ अन्वये दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा व पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ६ महिने सश्रम कारावास तसेच भा.दं.वि कलम ५०४ अन्वये दोषी धरून १ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १ महिना सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता सौ. संगीता अनिल ढगे यांनी काम पाहिले. मूळ फिर्यादीतर्फे अॅड. सुमित पाटील यांनी काम पाहिले, त्यांना पैरवी अधिकारी खामकर मॅडम, भंडलकर मॅडम, गायकवाड मॅडम, ठोंबरे व फलके यांनी सहाय्य केले.