बनावट सोनेतारण प्रकरणी आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :-  नगर जिल्हा सहकारी बँकेच्या सोनगाव (ता. राहुरी) शाखेतील बनावट सोनेतारण कर्जप्रकरणी 21 जणांवर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलीस ठाण्यात बँकेचे शाखाधिकारी प्रवीणकुमार पाराजी पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दखल करण्यात आला आहे. रा या फसवणूक प्रकरणी सराफासह 12 जणांना अटक करण्यात आली असून उर्वरित दहाजण पसार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांनी दिली.

दरम्यान या आरोपींना राहुरी न्यायालयात हजर केले असता त्यांना दि.26 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान, सराफ अरविंद विनायक नांगरे, संदीप बाळासाहेब अनाप, राजेंद्र भाऊसाहेब थोरात, राजेंद्र शिवाजी हारदे, मुनिर अब्दुल शेख, संदीप हरिभाऊ सजन, प्रेमकुमार संपतकुमार डुक्रे, अविनाश आबासाहेब नालकर, नवनाथ गोपीनाथ पठारे, दत्तात्रय विठ्ठल सिनारे, सचिन केशवराव निधाने, शिवाजी संपत संसारे, यांना अटक करण्यात आली आहे.

जिल्हा बँक शाखेतील नागरे या सराफामार्फत सोने तारणावर कोट्यवधी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले होते. मात्र, बनावट सोनेतारणाचे पितळ उघडे पडल्यानंतर जिल्हा बँकेचे प्रशासन खडबडून जागे झाले.

त्यानंतर हे दागिने सोडवून घेऊन कर्ज भरण्याचे आवाहन बँक प्रशासनाकडून करण्यात आले. त्यानंतर प्रशासनाने अशा कर्जदारांवर कायद्याचे हत्यार उपसले आहे. त्यामुळे गुन्हे दाखल होताच दहा आरोपी पसार झाले. तर बाराजणांना पोलिसांनी अटक केली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24