खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला पोलिसांनी केले गजाआड

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 07 फेब्रुवारी 2021:- कर्जत पोलीस स्टेशन हद्दीतील मिरजगाव पोलीस दुरक्षेत्र हद्दीतील तिखी, मिरजगाव येथे प्रमोद कोरडे, (रा. मिरजगाव, ता. कर्जत) हे बाळासाहेब विखे हॉस्पिटल, अहमदनगर येथे औषधोपचार घेत असताना काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता.

मयताचे मृत्यूबाबत कर्जत पोलीस स्टेशनला अकस्मात मयतची नोंद करून पोलीस मयताचे मृत्यूबाबत तपास करत होते. या तपासात मयताची पत्नी सुरुवातीस पोलिसांना माझे पतीचा मृत्यू हा आजारपणाने तसेच दारूचे नशेत अतीमद्यप्राशनाने कोमात गेल्याचे,

तसेच मयताचे मृत्यूबाबत तिची तक्रार नसल्याचे सांगत होती. मयतास बाहेरून दिसणाऱ्या जखमा नव्हत्या. परंतु कर्जत पोलिसांनी सखोल तपास करून माहिती घेतली. मयताचे वैद्यकीय अहवालाचे रिपोर्ट नाशिक आणि पुणे येथून प्राप्त केले. डॉक्टरांशी पत्रव्यवहार केला.

पोलिसांना मयताचे मृत्यू बाबत संशय निर्माण झाल्याने अधिक सखोल तपास केला असता काही मुद्द्यांवर संशय निर्माण झाला. मयताची पत्नी आणि इसम योगेश बावडकर,

दोन्ही रा. मिरजगाव, ता. कर्जत यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता वरील दोघांचे अनैतिक संबंध असल्याने त्यांचे संबंधांमध्ये पती अडसर ठरत असल्याने दोघांनी मयत याचे डोक्यात फुकणीने आणि इतर मारहाण करून खून केल्याचे उघडकीस आले.

दोन्ही आरोपीनी मयतास दवाखान्यात सुद्धा दाखल केले होते. या सर्व प्रकाराबाबत आरोपींनी पोलिसांना माहिती दिली आहे. आरोपींचे विरूद्ध मयताचे भावाची तक्रार घेऊन खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने माहिती लपवून ठेवली असा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24