अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :-जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीला लगाम लावण्यासाठी पोलीस प्रशासन सध्या आक्रमक झाले आहे. त्यातच जिल्ह्यात सध्या निडवणुकीची धामधूम आहे, यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन नेहमीच अलर्ट राहते आहे.
त्यातच गावठी कट्टा बाळगणाऱ्या एकास पोलिसांनी जेरबंद केले आहे. पप्पू उर्फ अशोक बाबासाहेब चेंडवाल (वय 24 रा. गुंजाळे ता. राहुरी जि. अहमदनगर) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, राहुरी तालुक्यातील गुंजाळे या गावात पप्पू चेंडवाल हा देशी बनावटीचे गावठी कट्टा बेकायदेशीर विनापरवाना स्वतःजवळ बाळगत आहे, अशी खात्रीशीर माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती.
या माहितीनुसार कटके यांनी पथकाला सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने गुंजाळे गावात जाऊन खंडोबा मंदिरकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा रचून पप्पू चेंडवाल याला पकडले. त्याची पंचासमक्ष अंगझडती घेतली. यावेळी त्याच्याजवळ 3 देशी बनावटीचे गावठी कट्टे व तीन जिवंत काडतुसे असे एकूण 91 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला.
तो पंचांसमक्ष जप्त करण्यात आला. सराईत गुन्हेगार पप्पू चेंडवाल हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी राहुरी पोलीस स्टेशन, चोपडा ग्रामीण (जि. जळगाव), एमआयडीसी, तोफखाना, वीरगाव (ता वैजापुर जि. औरंगाबाद), शेवगाव पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत.